
कोल्हापूर: जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. शहरातील नागरिकांनी कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हाच उत्तम पर्याय असल्याने नागरिकांनी लॉकडाउनचे तंतोतंत पालन करावे. नागरिकांनी लॉकडाउनच्या कालावधीत घरात राहून सुरक्षित राहावे. जेणेकरून आपण कोरोनाचा प्रादुर्भाव निश्चितपणे रोखू शकू, असा आशावाद आमदार चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला. तसेच पहिल्या दिवशी लॉकडाउनचे काटेकोर पालन केल्याबद्दल त्यांनी शहरवासीयांचे आभार मानले.
आमदार जाधव यांनी आज शहरातील विविध भागांना भेट दिली. नागरिकांना सर्व अत्यावश्यक सुविधा मिळतील याची काळजी प्रशासन घेत आहे, तसेच लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही आमदार जाधव यांनी यावेळी केले. जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांची भेट घेऊन, जिल्ह्यातील एकूण लॉकडाउनचा आढावा घेतला.
Leave a Reply