
कोल्हापूर:चालू खरीप हंगाम म्हणजेच २०२०-२१ मध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सबंध देशात अव्वल ठरली आहे. दिलेल्या इष्टांकाच्या २०८ टक्के खरीप पीककर्जाचे वाटप करीत बँकेने हा बहुमान मिळविला आहे. ६८६ कोटीचा इष्टांक असलेल्या या बँकेने तब्बल १४२९ कोटी रुपये खरीप पीक कर्जाचे वाटप केले आहे*.याबाबत अधिक माहिती अशी, महाराष्ट्रासह संबंध देशातच खरिपाच्या पिककर्ज वाटपामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांनीही हात आखडता घेतला आहे. अशा परिस्थितीत केडीसीसी बँकेने केलेले उच्चांकी कर्ज वाटप निश्चितच कौतुकास्पद आहे. ही बाब गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीने आलेला महापूर व गेल्या तीन महिन्यात कोरोनामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला आधार देणारी आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा समन्वय समितीच्या माध्यमातून मिळालेल्या इष्टांकाच्यापेक्षा किती तरी पुढे जात जिल्हा बँकेने त्यापेक्षा जादा कर्ज वाटपाची गेल्या पाच वर्षांची ही परंपरा अबाधित ठेवली आहे.खरीप हंगामाच्या पिकांमध्ये ऊस, केळी या बारमाही पिकांसह भुईमूग, भात, सोयाबीन, उडीद, सूर्यफूल, नाचणी या खरीप पिकांचा समावेश आहे.केचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरीच या बँकेचा मालक आहे आम्ही फक्त विश्वस्त आहोत. ज्या- ज्या वेळी शेतकऱ्यांना काही द्यावयाचा विषय येतो, त्या -त्या वेळी ही बँक नेहमीच अग्रेसर राहिली आहे. ही बँक सर्वसामान्य, गोरगरीब शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाची जननी आहे.
Leave a Reply