कागल : कागल, मुरगुड व गडहिंग्लज या शहरांसह तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामस्थांच्या ऑक्सिजन तपासणीसाठी ग्रामपंचायतीकडे आँक्सीमिटर व तापमान मोजणीसाठी थर्मल स्कॅनर मशीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे हस्ते प्रदान करण्यात आली. मंत्री हसन मुश्रीफ यांची तपासणी मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी केली. काल बारा वाजता आढावा बैठकीत दिलेला शब्द मंत्री मुश्रीफ यांनी अवघ्या वीस तासात पूर्ण केला.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अडीचशे लोकांमागे एक समिती निर्माण करून घराघरात जाऊन ऑक्सिमीटर व टेंपरेचर तपासणेसाठी साहित्य पुरवठा करू, असे आश्वासन दिले होते. आज आश्वासनाची पूर्तता केली. कागल शहरासाठी २०० ऑक्सीमीटर व २०० थर्मामीटर, गडहिंग्लज शहरासाठी २०० ऑक्सीमीटर व २०० थर्मामीटर, तालुक्यातील ग्रामीण भागासाठी २५० ऑक्सीमीटर व २५० थर्मामीटर ऑक्सीमीटर देण्यात आली. कडगाव, उत्तूर भागासाठीही लवकरच साहित्य पुरवले जाणार आहे.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ग्रामीण भागात आशावर्कर्स, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यामार्फत गावागावात तपासणी केली जाईल. ज्या लोकांची ऑक्सिजनची पातळी कमी आहे किंवा ज्यांना टेंपरेचर आहे अशांवर उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे भविष्यातील धोका टळणार आहे. जनतेने तसेच आबालवृद्धांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले, एकूण लोकांपैकी 96 टक्के लोकांना लक्षणे नाहीत. उर्वरित तीन टक्के लोकांना आँक्सिजनची गरज असते, केवळ एक टक्के लोकांना व्हेंटीलीटरची आवश्यकता असते. कागल कोरोना काळजी केंद्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह या ठिकाणी ऑक्सीजन पाईप जोडण्याचे काम सुरू आहे. तसेच व्हेंटिलेटरही उपलब्ध करून देण्यात आले आहे. माझ्या मतदारसंघातील एकही व्यक्ती कोल्हापूरला सिव्हिल हॉस्पिटलला जाणार नाही. तसेच त्याला बेड मिळाला नाही अशी तक्रार राहणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात डँशबोर्ड लावण्याची सूचना जिल्हाधिकार्यांना केली आहे. कोणाचाही मृत्यू असो, तो दुर्दैवीच आहे. तो आपल्या घरातील आहे, असे समजून प्रशासनाने काळजीपूर्वक काम करावे, अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. ऑक्सीजन मीटरद्वारे व थर्मल मीटरद्वारे तपासणी येत्या आठवड्याभरात पूर्ण झाली पाहिजे. तसेच महिन्यातून दोन वेळा ही तपासणी केली जाणार आहे. असे ते म्हणाले.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, कागल पंचायत समितीचे सभापती विश्वासराव कुराडे, माजी उपसभापती रमेश तोडकर, सदस्य दीपक सोनार, गट विकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, कागल नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, मुख्याधिकारी पंडित पाटील, मुरगुड नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, गडहिंगलज नगरपालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply