
कोल्हापूर :जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्येचा विचार करता एकही रुग्ण दगावू नये याची जबाबदारी डॉक्टरांनी घ्यावी, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत केली.
सीपीआर हॉस्पिटल येथे बेडअभावी मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर आमदार जाधव यांनी डॉक्टरांच्याबरोबर झालेल्या बैठकीत ही सूचना केली. उपचाराअभावी आजतागायत तीन रुग्ण दगावले असून यापुढे अशी कोणतीही दुर्दैवी घटना होऊ नये यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत आमदार जाधव यांनी शहरातील कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबत चर्चा करून त्यांच्याकडे असणारी उपचाराची यंत्रणा व त्यांना या अनुषंगाने आवश्यक असणारी सर्व माहिती घेतली.
आमदार जाधव यांनी सर्व डॉक्टरांना सक्त सूचना केली की, आपल्या दारात आलेल्या रुग्णाची गैरसोय होऊ नये याकडे लक्ष द्यावे. परिस्थितीनुसार त्याच्यावर डॉक्टर या नात्याने योग्य ते उपचार करावेत, उपचाराकडे दुर्लक्ष होऊ नये याकडे स्वतः लक्ष द्यावे. यासाठी जी काही मदत लागेल त्यासाठी कधीही प्रशासनाशी अथवा स्वतः माझ्याशी संपर्क साधावा.दरम्यान, या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह शहरातील डॉक्टर उपस्थित होते.
Leave a Reply