
राष्ट्रासमोरील आव्हानांवर मूलगामी उपाय : हिंदु राष्ट्राची स्थापना !
सध्या भारत एका नाजूक वळणावर उभा आहे. देशावर आंतर-बाह्य अशी संकटांची मालिका चालू आहे. असा काळ भारताच्या स्वातंत्र्याच्या 72 वर्षांत कधीच आला नव्हता. एका बाजूला देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. या महामारीला थोपवण्यासाठी भारत सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. मागील 4 महिने देशात लॉकडाऊन आहे. सर्व यंत्रणा कार्यरत असूनही अपेक्षित यश मिळतांना दिसत नाही. अशा प्रकारे देशांतर्गत आरोग्य समस्येने कोट्यवधी जनतेला घरी बसवल्याने अर्थव्यवहार ठप्प आहेत, बेकारी वाढली आहे, तर विकासदर थांबला आहे. अशा परिस्थितीतच देशावर बाह्य आक्रमण चालू झाले आहे. शेजारील राष्ट्र चीनने भारताच्या विरोधात दंड थोपटले आहेत. गलवान खोर्यात चिनी सैनिकांनी घुसखोरी करून भारतीय सैनिकांवर जीवघेणे आक्रमण केले. यात भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले; मात्र भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना ठार करून त्याला चांगलाच धडा शिकवला. यामुळे चीनचा अहंकार दुखावला गेला.अमेरिकेने चीनला कोरोना महामारीसाठी कारणीभूत ठरवणे, त्याला भारताने दुजोरा देणे, त्या निमित्ताने भारताचे अमेरिकेशी घनिष्ट संबंध निर्माण होणे, तसेच अमेरिकेने भारताला जागतिक स्तरावर चीनला पर्याय म्हणून समोर आणण्यचा प्रयत्न चालू करणे, या सर्व प्रकारांमुळे होणार्या आर्थिक नुकसानीचा बदला म्हणून चीनने आता भारताच्या विरोधात उघड युद्ध चालू केले आहे. यासाठी भारताला चारही बाजूने घेरण्याचा तो प्रयत्न करू लागला आहे. भारताचा जुना शत्रू असलेल्या पाकिस्तानला भारताच्या विरोधात कुरघोडी करण्यास तो उद्युक्त करत आहे, तसेच भारताचा पारंपरिक मित्र नेपाळलाही तो भारताच्या विरोधात फितवून भारताच्या भूभागावर दावा करण्यास उद्युक्त करत आहे. दुसरीकडे बांगलादेशात गुंतवणूक करून बांगलादेशालाही स्वतःच्या कह्यात ठेवण्याचा प्रयत्न त्याने चालू केला आहे. अशा प्रकारे भारतावर चारही बाजूंनी एकाच वेळी आक्रमण करण्याचा चीनचा मनसुबा समोर येत आहे. एकंदरीत चीन आणि त्याच्या ताटाखालची मांजरे बनलेली राष्ट्रे एका बाजूला आणि चीनच्या विरोधात भूमिका घेणारी राष्ट्रे दुसर्या बाजूला, असे जागतिक स्तरावर उघड 2 गट पडले आहेत. ही सर्व परिस्थिती तिसर्या महायुद्धासाठी अनुकूल बनत आहे, हे दिसून येते.या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. चीनला शह देण्यासाठी अमेरिकेशी संबंध दृढ करणे, युरोपीय राष्ट्रांचे साहाय्य मिळवण्याचा प्रयत्न करणे, असे सरकारकडून प्रयत्न होत आहेत, परराष्ट्रनीतीचा भाग म्हणून हे करणे योग्य आहे. भारत सध्या घेत असलेला आक्रमक पावित्रा हे पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांचा परिपाक आहे. असे असले, तरी देशासमोरील बिकट स्थिती पहाता, या प्रयत्नांमध्ये आणखी गतीमानता येणे अपेक्षित आहे. अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रे यांचा भारतद्वेष लपून राहिलेला नाही. गेली अनेक दशके भारतद्वेषापायी त्यांनी पाकला आर्थिक साहाय्य केले. या आर्थिक साहाय्याचा अपलाभ घेत पाकने हा पैसा जिहादी आतंकवाद पोसण्यासाठी वापरला. हा पाकपुरस्कृत आतंकवाद आणि त्याला छुपा पाठिंबा देणारा चीन या राष्ट्रांना आता डोकेदुखी बनल्याने ही राष्ट्रे भारताच्या बाजूने उभी आहेत; मात्र हा पाठिंबा मैत्रीतून निर्माण झालेला नाही. तर भारत हा चीन किंवा पाक यांच्या विरोधात काहीतरी करत आहे, तर त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचे हित साधण्याचा या राष्ट्रांचा प्रयत्न आहे. त्यामुळे जेव्हा खरोखरच युद्धाची वेळ येईल, तेव्हा ही राष्ट्रे भारताला कितपत साहाय्य करतील, हाही प्रश्न आहे. यासाठीच ‘स्वत:च युद्धसज्ज आणि स्वयंपूर्ण होणे’ यांशिवाय भारताला पर्याय नाही. हे पहाता मोदी चीन, पाक आणि आता नेपाळ यांना कशा प्रकारे हाताळतात, यावर भारताचे भविष्य अवलंबून असेल.कूटनीतीक किंवा अन्य प्रयत्नांसह शत्रूवर वरचढ व्हायचे असेल, तर त्यासाठी धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था आवश्यक असते. इतिहास त्याला साक्षी आहे. काळाच्या कसोटीवर आपल्याला खर्या अर्थाने यशस्वी व्हायचे असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या डोळ्यांसमोर ठेवावा लागेल. नुसता तात्त्विक स्तरावर नव्हे, तर तो आदर्श भारतीय नेतृत्वाने अंगीकारणे काळाची आवश्यकता आहे. आजसारखी परिस्थिती 400 वर्षांपूर्वीही होती. त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या सर्व गुणांनी संपन्न राजाने पाच पातशाह्यांना धूळ चारली. असा राज्यकर्ता धर्माधिष्ठित असतो. त्यामुळे आजच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. जोवर आपला देश तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या वळचळणीला असेल, तोवर या देशाचे भवितव्य अधांतरीच आहे.या संकल्पनेचा आणखी एक कंगोरा आहे. आज जिहादी आतंकवाद आणि चीन-नेपाळचा साम्यवाद या बाह्य आव्हांनासोबतच भारताला आंतरिक असुरक्षिततेच्या समस्येनेही ग्रासले आहे. 30 वर्षांपूर्वी ‘जिहादी आतंकवाद’ नावाच्या रक्ताने माखलेल्या ‘काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद’ येथपर्यंत मागे जायची आवश्यकता नाही. गेल्या वर्षभरातील घटनाही भारताच्या आंतरिक कायदा आणि न्याय व्यवस्थेला आव्हान ठरत आहेत. गेल्या डिसेंबर महिन्यात संमत झालेल्या मानवतेच्या हिताच्या ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’ला प्राणपणाने विरोध करणार्यांनी देशभरात दंगली घडवल्या, जाळपोळ केली, देशाच्या संपत्तीची अपरिमित हानी केली. राजधानी देहलीपासून ते कानपूर, मुंबई अगदी दक्षिण भारतातही या राष्ट्रद्रोही घटनांचे लोण पसरले होते. हे राष्ट्रविघातक षड्यंत्र भारताला मोडकळीस आणण्यासाठी प्रयत्नरत आहे. हे उदाहरण हल्लीचे आहे. खरेतर आपण गेल्या 7 दशकांत हरप्रकारे यावर आळा घालण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली; परंतु दिवसेंदिवस आंतरिक सुरक्षेची समस्या हाताबाहेर जात आहे. या समस्येवर खरेतर हिंदूंनी आता सर्व स्तरांवर आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक बनले आहे. कारण आध्यात्मिक स्तर सोडला, तर भारताने सर्वच स्तरांवर प्रयत्न करून पाहिले; परंतु भारतीय व्यवस्था या समस्यांवर मूलगामी उपाययोजना शोधण्यास सपशेल अपयशी ठरली आहे, हे आपल्याला मानावे लागेल. समस्येची तीव्रता कमी न होता ती अनेक पटींनी वाढत जाणे, यातूनच आजच्या व्यवस्थेचा फोलपणा स्पष्ट होतो.त्यासाठी आता भारताला आध्यात्मिक स्तरावरील ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याला पर्याय नाही. यासाठी हिंदूंनाच संघटित होऊन राष्ट्र आणि धर्म उत्थानासाठी कार्यरत झाले पाहिजे. नेमक्या याच कारणासाठी हिंदु जनजागृती समिती मागील 8 वर्षे गोवा येथे अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांचे यशस्वी आयोजन करत आली आहे. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव चालू असल्याने 30 जुलैपासून आरंभ होणारे हे अधिवेशन ऑनलाईन असणार आहे. त्या निमित्ताने देश-विदेशातील हिंदुत्वनिष्ठ त्यांच्या-त्यांच्या निवासस्थानी राहून या अधिवेशनात ऑनलाईन सहभागी रहाणार आहेत. तसेच एकाच वेळी हजारो हिंदुत्वनिष्ठ, राष्ट्राभिमानी, धर्माभिमानी, जिज्ञासू या अधिवेशनाचा लाभ करवून घेणार आहेत. या अधिवेशनात मांडल्या जाणार्या विचारांतून ‘हिंदु राष्ट्राची नेमकी आवश्यकता’, ‘राष्ट्र आणि हिंदु धर्म यांवर वारंवार होणार्या आघातांमागील कारणमीमांसा आणि त्यावरील परिपूर्ण उपाययोजना’ आदी विषयांवर व्यापक विचारमंथन केले जाईल. हे अधिवेशन 30 जुलै ते 2 ऑगस्ट आणि 6 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2020 या कालावधीत संपन्न होणार आहे. अधिवेशन हिंदु जनजागृती समितीच्या अधिकृत ‘फेसबूक पेज’ आणि ‘यू-ट्यूब चॅनल’वर पहाता येईल. सर्व राष्ट्र आणि धर्मप्रेमी मंडळींनी या अधिवेशनाचा अवश्य लाभ करून घ्या.
Leave a Reply