कोल्हापूर:कोल्हापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेकायदेशीर नोकर भरती झाली आहेे. तसेच गेल्या ४ वर्षात संचालक मंडळाने अनेक चुकीचे आणि नियमबाहय निर्णय घेवून, मोठया प्रमाणात गैर व्यवहार केला आहे. याबाबतची चौकशी सध्या जिल्हा उपनिबंधकामार्फत सुरू आहे. मात्र ही चौकशी अत्यंत संथ गतीने आणि राजकीय दबावाखाली होत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय. या प्रकरणातील दोषींना तातडीने गजाआड करावे, अन्यथा ४ हजार अर्जदारांसोबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू, आणि प्रसंगी कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन करू, असा इशारा भाजप किसान मोर्चाच्या वतीनं देण्यात आला आहे.कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकर भरतीसाठी अर्ज केलेल्या चार ते साडेचार हजार उमेदवारांना डावलून, संचालक मंडळानं आपल्या मर्जितील लोकांची वशिल्यानं भरती केली. त्याबद्दलच्या तक्रारी मोठया प्रमाणात आल्या. तसेच गेल्या ४ वर्षात संचालक मंडळाने गैर कारभार केल्याप्रकरणी अनेकांनी पणन विभाग आणि जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानुसार बाजार समितीच्या नोकरभरती प्रक्रियेची आणि ४ वर्षातील कारभाराची, त्रिस्तरीय चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. मात्र चौकशी समितीकडून अतिशय संथ गतीने आणि राजकीय दबावाखाली चौकशी होत असल्यामुळे, या प्रकरणातील दोषी व्यक्तींवर कारवाई होण्याची शक्यता कमी असल्याचा आरोप, भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे आणि उपाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केला आहे. येत्या आठवडयाभरात तातडीने कारवाई करून, दोषी संचालकांना गजाआड करावे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि बाजार समितीवर प्रशासक नेमावा, अन्यथा जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर अर्जदारांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भगवान काटे आणि नाथाजी पाटील यांनी दिला आहे. चौकशी समितीने निःपक्षपणे आणि गतीमान चौकशी केली, तर बाजार समितीच्या संचालक मंडळाचे अनेक गैर व्यवहार उघडकीला येतील. त्यामध्ये नियमापेक्षा कमी पैशात भाड्याने जागा देणे, एखाद्या जागेचा करार २९ वर्षाच्या असावा असा नियम असताना त्याची अमलबजावणी न करणे, शासन निकष डावलून आस्थापनेवर ४५ % पेक्षा अधिक खर्च करणे, इतिवृत्तात बोगस ठराव घुसडून नोकरभरती करणे, समिती खर्चात आर्थिक अनियमितता असणे अशा अनेक गोष्टी उघडकीला येण्याची शक्यता आहे, असेही भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे आणि उपाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी म्हंटले आहे.
Leave a Reply