
कोल्हापूर : प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रम हा राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम असून त्याअंतर्गत युवक-युवतींसाठी अनेक कौशल्यांचे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. याचा मोठ्या प्रमाणात लाभ करून घ्यावा, असे आवाहन राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या पुणे विभागीय कार्यालयाचे उपसंचालक डी.डी. पवार यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग व महाराष्ट्र माहिती सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने संचलित युवक कल्याण कक्षात आज प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रमाचा प्रारंभ श्री. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. श्री. पवार यांच्या हस्ते उपक्रमाच्या नामफलकाचे अनावरण करून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलसचिव डॉ. नितीन सोनजे होते.
श्री. पवार म्हणाले, या उपक्रमांतर्गत युवकांना आवश्यक विविध कौशल्य अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. राज्यात ठिकठिकाणी अशी केंद्रे स्थापन करण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम जोमाने राबविण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. सर्वांसाठी मोफत उपलब्ध असणाऱ्या या सर्व उपक्रमांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी आपला विकास साधावा, असेही ते म्हणाले.
डॉ. सोनजे म्हणाले, प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्य शासनाने युवकांच्या कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. युवक, युवतींनी या उपक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करणे आवश्यक आहे. विद्यापीठाच्या युवक कल्याण कक्षात अकौंटिंग, बँकिंग, सॉफ्ट स्कील डेव्हलपमेंट, डीटीपी, करिअर कौन्सेलर तसेच मेकअप आर्टिस्ट, ब्युटी ॲडव्हायजर आदी ११ अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यांचाही लाभ घ्यावा.
यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक जी.ए. सांगडे, विद्यापीठ कौशल्य विकास व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक सचिन जाधव व युवा जागर अभियानाचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply