
कागल:शनिवार दि. १५ ऑगस्ट २०२० म्हणजेच देशाचा ७४ वा स्वातंत्र्यदिन. कागल कोविड केअर केंद्रातील हे चित्र. दुपारी दोनची वेळ असेल साधारणता. या केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत शिंदे हे एकटेच एका कोरोनाबाधित वृद्धाचा मृतदेह रॅपरमध्ये गुंडाळत होते. विशेष म्हणजे डॉ. शिंदे यांचे आई-वडील कोरोनाबाधित असल्यामुळे कोल्हापुरातील दवाखान्यात उपचार घेत असतानाही ते आपली सेवा इमानेइतबारे बजावत होते. त्यांना माझा अंतःकरणपूर्वक सलाम! मूळचे हुपरीचे असलेले डॉ. शिंदे सध्या कसबा सांगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कागल कोविड केअर केद्राचाही चार्ज त्यांच्याकडेच आहे.कागल तालुक्यातील हसुर खुर्द या गावाच्या ७० वर्षीय कोरोनाबाधित वृद्धाचा मृतदेह तो ठेवलेला होता. या मृताचे सर्वच कुटुंबीय स्वॅब देण्यासाठी या केंद्रात आणले होते. तेही काही अंतरावर उभे होते.याबाबत अधिक माहिती अशी, कोरोनाची लक्षणे दिसताच या वृद्धाला गडहिंग्लज येथील शेंद्री माळावरील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले होते. दोन-तीन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील खाजगी दवाखान्याकडे पाठविण्यात आले. त्यांना घेऊन सरकारी ऍम्ब्युलन्स त्या खाजगी दवाखान्याच्या दारात येताच त्यांचा मृत्यू झाला. ॲम्बुलन्स तशीच कागल कोविड केअर सेंटरमध्ये आणली. देण्यासाठी तिथे आलेल्या नातेवाईकांनी मृतदेह दाखविण्यात आला. त्यानंतर रॅपरमध्ये गुंडाळून तो मृतदेह कागल नगरपालिकेच्या स्वाधीन करण्यात आला व कागल नगरपालिकेच्यावतीने कागलच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
चला, कोरोना योद्ध्यांचे मनोबल वाढवूया!
कोरोनावर उपचार करणारे सरकारी दवाखाने असोत, कोविड केअर सेंटर असोत की खाजगी दवाखाने…. तिथल्या निगेटिव्ह बातम्याच आणि अफवाच सर्रास बाहेर येतात. या सगळ्यामुळे कोरोना संसर्गाच्या महामारीविरुद्ध लढणार्या योद्ध्यांचे खच्चीकरण होत आहे . त्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांचे आत्मबल – मनोबल वाढावे आणि त्यांच्या हातून अधिकाधिक कार्यक्षमपणे सेवा घडावी, म्हणूनच ही पोस्ट लिहिण्याचा माझा हा खटाटोप आहे. आपण सर्वांनी ती पोस्ट अधिकाधिक व्हायरल करूया आणि अशा कोरोना योध्द्याचे मनोबल वाढवूया
Leave a Reply