वयात येणार्‍या मुला-मुलींचे पालक नव्हे; मित्र बना; नकार किंवा अपयश पचवण्याची सवय लावा

 

कोल्हापूर : वयात येणार्‍या मुला-मुलींचे पालकत्व निभावत असताना त्यांचे मित्रही बना. मुलांना तुमच्यासमोर मन मोकळे करण्याची संधी देऊन त्यांच्याशी संवाद साधा असे आवाहन बालरोग तज्ञांच्या वेब सेमिनारमध्ये करण्यात आले.
वयात येणार्‍या मुला-मुलींच्याबद्दल भागिरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्यावतीने ‘कळी उमलताना’ हा कार्यक्रम घेतला जातो. पण वयात येणार्‍या मुलांच्या शारीरीक, मानसिक बदलावर आजवर कधीच खुली चर्चा झालेली नाही. हे लक्षात आल्याने भारतीय बालरोग संघटना, रोटरी ड्रीस्ट्रीक्ट 3170 आणि इनरवील क्लबच्यावतीने पौगंडावस्थेतील मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी ‘देऊ ताकद मुलांना, अपयशासी दोन हात करण्याची:!’ या विषयावरील वेब सेमिनार आयोजित करण्यात आला होता. भारतीय बालरोग संघटना आणि असोसिएशन ऑफ ऍडोल्टसन अ‍ॅण्ड चाईल्ड केअर इन इंडियाच्या संचालीका डॉ. स्वाती भावे यांनी झूम आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यामातून मार्गदर्शन केले. आजच्या युवा पिढीमध्ये नकार किंवा अपयश पचवण्याची ताकद नाही. वयात येणर्‍या मुला-मुलींच्याबरोबर पालकांचा संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे मुले मोबाईलमध्ये गुंतली आहेत. काहीवेळा वयातील मुला-मुलींच्यामध्ये नैराश्य आणि आत्महत्येचे प्रमाणही वाढले आहे. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी पालक आणि मुलांचे संवाद सेतू बनावे तसेच त्यांना आजच्या स्पर्धेच्या युगात नकार आणि अपयश पचवण्याएवढा आत्मविश्वास निर्माण करावा असे आवाहन डॉ. स्वाती भावे यांनी केले.
प्रख्यात बालरोग तज्ञ डॉ. प्रकाश संघवी यांनी पौगंडावस्थेतील मुलांच्यामध्ये नैराश्य किंवा आत्महत्येचे विचार येत असतील तर पालकांनी त्याला विश्वासात घेऊन बोलते करावे आणि मानसोपचार तज्ञांचा वेळीच सल्ला घ्यावा अशा परिस्थतीमध्ये मुलांचे चांगले पालक बनण्याबरोबरच त्यांचे मित्रही बना असा सल्ला दिला. डॉ. दिपा कित्तूर यांनी पालकांनी मुलांच्यावर आपल्या अपेक्षांचे ओझे लादू नये त्यांच्या बौधिक व शारीरीक क्षमता ओळखून त्यांचे करियर घडवू द्यावे असे नमूद केले. डॉ. प्रसन्न पवार यांनी घरातील मोठ्या व्यक्तिनीं मुलांच्यासमवेत एकवेळ जेवण घ्यावे आणि यातून दिवसभराच्या घटनांचा त्यांच्याकडून आढावा घ्यावा. जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने जीवन कौशल्यावरील कार्यशाळा आयोजित केली जाते. त्याचाही मुलांना लाभ मिळवून द्यावा असा सल्ला दिला.
या वेब सेमिनारमध्ये रोटरी डिस्ट्रीक्ट 3170 चे संग्राम पाटील, उत्कर्षा पाटील, शिल्पा देशपांडे, रितू वायचळ, रुपाली बाड, अनिकेत अष्टेकर, शिशीर मिरगुंडे यांच्यासह नामवंत बालरोग तज्ञ आणि मानसोपचार तज्ञ सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!