
मुंबई:स्मार्ट गव्हर्नन्स,स्मार्ट सिटी, राईट टू सर्व्हिस ॲक्ट अशा विविध योजनांची अंमलबजावणी व तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून शाश्वत विकासासाठी शासन कटिबध्द असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.‘इंडिया लिडरशिप फोरम-2016’कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी नॅसकॉमचे चेअरमन आर. चंद्रशेखर, व्हाईस चेअरमन सी.पी. चुराणी,बी.व्ही.आर. मोहन रेड्डी, राजेश नाम्बियार आदीसह उद्योजक उपस्थित होते.
भारत नेतृत्व विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठा पल्ला गाठावयाचा असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, ‘स्मार्ट सिटी’च्या माध्यमातून पायाभूत सुविधा उभ्या करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे शहरांच्या विकासासोबत आधुनिक सेवा ग्रामीण भागातही पुरविण्यात येणार आहेत. तंत्रज्ञानाने आपल्याला अनेक संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. स्मार्ट कम्युनिटी, स्मार्ट सिटी यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन शाश्वत विकास साधण्याचे उद्दिष्ट आहे.
लोकशाहीचे पारदर्शक कारभाराचे तत्त्व स्मार्ट गव्हर्नन्सच्या माध्यमातून साध्य होईल. त्यामुळे ‘आपले सरकार’ या वेबपोर्टलच्या ऑनलाईन सेवांची संख्याही लवकरच वाढविण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात उद्योग उभारणीसाठी ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’च्या माध्यमातून पायाभूत सुविधांसह अनेक सोयी-सवलती दिल्या आहेत. राज्यात एक खिडकी योजना सुरु करण्यात आली असून उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. राईट टू सर्व्हिस ॲक्टअंतर्गत पारदर्शक कारभारासाठी व प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी प्रशासनावर सेवा देण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. या सर्व सेवा विनाविलंब देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे सांगून नॅसकॉमच्या चोवीस वर्षातील उद्योग क्षेत्रातील कामगिरीचेही त्यांनी यावेळी कौतुक केले.
गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी उपलब्ध असून ‘मेक इन इंडिया सप्ताह’च्या माध्यमातून उद्योगांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
Leave a Reply