
कोल्हापूर : शालिनी फिल्म्स या बॅनरखाली निर्माता सुर्यकांत खवळे यांचा सत्यघटनेवर आधारित विघ्नहर्ता महागणपती हा चित्रपट येत्या १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.२०१० साली लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या २१ दिवसात ३ रुपात दिसणाऱ्या देवगड तालुक्यातील तारामुंबरी गावातील खवळे गणपतीवर आधारित या चित्रपटाचे कथानक आहे.विज्ञान आणि श्रद्धा यांचा सुरेख मेळ या चित्रपटात पहायला मिळेल. अंधश्रद्धा किंवा चमत्कार असे कोणतेही प्रकार या चित्रपटात नाहीत.तर या उलट श्री गणेशावर अपार श्रद्धा यामुळे आलेल्या संकटाना एक कुटुंब कसे धैर्याने तोंड देते त्यातून ते कसे तरून जातात हे यात पहायला मिळणार आहे.अष्टविनायक या गणपतीवर आधारित चित्रपटानंतर अनेक वर्षांनंतर विघ्नहर्ता महागणपती हा चित्रपट मराठीत येत आहे.वेगळ्या धाटणीचा विषय असल्याने भूमिकेबद्दल खूपच समाधान वाटत आहे असे मुख्य भूमिकेत असलेले आघाडीचे अभिनेते समीर धर्माधिकारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.दिग्दर्शन राजेश चव्हाण यांनी केले आहे.गीत रचना संजय नवगिरे यांची तर सुरेश वाडकर,रूपकुमार राठोड,प्रसन्नजीत कोसंबी,राहुल सक्सेना यांनी गाणी गायली आहेत.प्रिया मराठे, अलका कुबल-आठल्ये तेज राणे,विजय चव्हाण,शरद पोंक्षे,रुई जाधव,जयंत सावरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
खवळे गणपती हा वंशवृद्धी करणारा आहे.३१४ वर्षाची परंपरा या गणपतीला लाभली आहे.भाविक,राजकारणी मंडळी या गणपतीच्या दर्शनासाठी गणेश चतुर्थीला लांबून येतात.या गणपतीची ख्याती जगभरात पोहचावी याच उद्देशाने या चित्रपटची निर्मिती केली आहे.वेगळा विषय,दर्जेदार नितीमुल्ये,उत्कृष्ट दिग्दर्शन,दिग्गज कलाकारांच्या भूमिका यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असा विश्वास निर्माते सुर्यकांत खवळे यांनी व्यक्त केला.पत्रकार परिषदेस या चित्रपटची संपूर्ण टिम उपस्थित होती.
Leave a Reply