
कोल्हापूर :वारणा बझार व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जागो ग्राहक जागो हे ग्राहक जागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानास वैद्य मापन शास्त्र यंत्रणा व अन्न व औषध प्रशासन यांचे सहकार्य लाभले असून या अंतर्गत गावागावांमध्ये ग्राहक जागृती रथाद्वारे प्रबोधन करण्यात येत आहे. हा उपक्रम अत्यंत स्त्युत्य असून याचा ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा व आपली फसवणूक टाळावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले.
वारणा बझारतर्फे राबविण्यात येत असलेल्या ग्राहक प्रबोधन दिंडीस व ग्राहक जागृती रथास जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पाहणी करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी संजय पवार, वारणा बझारचे उपाध्यक्ष सुभाष देसाई, व्यवस्थापक शरद महाजन, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी ए. टी. वाकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जीवनावश्यक वस्तूंमध्ये दिवसेंदिवस होणारी भेसळ व वजन मापांमध्ये फसवणूक तसेच ब्रँडेड कंपनीसारखा दिसणारा पण हलक्या प्रतीचा माल देवून ग्राहकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे दैनंदिन जीवनात ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना अधिक जागृकतेने करावी, यासाठी वारणा बझारतर्फे एकसारखे दिसणारे पॅकींग, ब्रँडेड कंपनीचा माल व फसवणूक करुन दिला जाणारा माल यांचे नमूने या वाहनात ठेवण्यात आले आहेत. वजन मापांमधील फसवणूकीसंदर्भातही माहितीपत्रकांद्वारे माहिती देण्यात येत आहे. फसवणूकीनंतर कोठे दाद मागावी याबाबतही या रथाद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे.
पन्हाळा, करवीर, हातकणंगले, वाळवा, शिराळा या तालुक्यांमधील 100 गावांमधून या रथाद्वारे शाळा, कॉलेज, मध्यवर्ती ठिकाणी प्रबोधन करण्यात आले आहे. 15 मार्चपर्यंत हा रथ फिरता राहणार आहे.
Leave a Reply