
कोल्हापूर: सद्यस्थितीत शेतकरी चोहोबाजूंनी संकटात आहे. त्याच्यासमोर लॉकडाऊनमुळे शेत मालाला बाजारपेठ उपलब्ध झाली नाही. परिणामी शेती उत्पादनांना योग्य भाव मिळाला नाही. तसेच शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कर्ज माफी योजना आणली पण या योजनेपासून अजून शेतकरी वंचित आहेत आणि शासनाने त्यात केलेली भरमसाठ वीज दरवाढ व नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिके यांचे झालेले नुकसान यामुळे शेतकरी पूर्णपणे भरडला गेला असून आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी त्यांच्याकडूनच प्रत्यक्ष त्यांच्या बांधावर जाऊन समजून घेण्यासाठी या दौऱ्यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे येत्या ६ नोव्हेंबरपासून जिल्हा दौऱ्यास सुरुवात करणार आहेत. पहिल्या टप्प्यात करवीर तालुक्यातील चिंचवाड गावातून सुरुवात करून बोरंबे, सोनाळी त्यानंतर राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी अशा सर्व तालुक्यांमधील गावांना व तेथील शेतकऱ्यांशी चर्चा करून सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत तात्काळ द्यावी, यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकारांची बोलताना दिली.
शासनाने प्रामाणिकपणे भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान त्यांच्या कर्जाची रक्कम ३० जून पर्यंत भरल्यास देण्यात येईल असे जाहीर केले होते. याला चार महिन्याचा कालावधी उलटून गेला शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरले. तरीही शेतकऱ्यांना ते मिळालेले नाही. हा प्रामाणिक शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे. कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा सरकार कधी करणार आहे, असा थेट सवाल देखील समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारला विचारलेला आहे. सरकारकडून दहा हजार कोटींचे पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आले परंतु याचा जीआर लवकरात लवकर निघाला पाहिजे. या पॅकेजबाबत सरकारचे कोणतेही स्पष्टीकरण मिळालेले नाही.
राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी मदत केली पाहिजे. या सरकारला जाग आणली पाहिजे. शाहू महाराजांचे घराणे म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. म्हणूनच शाहू जनक घराण्याची जनपंचायत अंतर्गत जिल्हा दौरा असा कार्यक्रम राबवीत आहोत, असेही समरजीतसिंह घाटगे यांनी सांगितले .पत्रकार परिषदेला माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शोमिका महाडिक, माजी आमदार अमल महाडिक,भाजप किसान सेलचे अध्यक्ष भगवानराव काटे, सुनील मगदूम, विजय भोज, संजय पाटील, भाजप उपाध्यक्ष अजिंक्य इंगवले आदी उपस्थित होते.
Leave a Reply