जिल्हा एक्स्पोर्ट प्रोमोशन कमिटीची पहिली सभा संपन्न

 

कोल्हापूर: कोरोना काळात उद्योगधंदे आर्थिक नुकसानीत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्पादन क्षेत्राला नवसंजीवनी प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने व जागतिक बाजारपेठेमध्ये देशाची निर्यात   वाढवण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून देशातल्या औद्योगिक दृष्ट्या अग्रेसर असलेल्या जिल्ह्यात एक निर्यात प्रचालन समितीची स्थापन करण्यात यावी अशी सूचना करण्यात आली होती. यामध्ये औद्योगिक दृष्ट्या अग्रेसर असणाऱ्या कोल्हापूरचाही समावेश करण्यात आला आणि तात्काळ समितीचे गठनही करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यातून औद्योगिक, शेती, अभियांत्रिकी, आयटी चामड्याच्या उत्पादनांची व अन्य उत्पादनांची निर्यात वाढावी यासाठी केंद्र शासन करित असलेल्या विविध योजना, तसेच निर्यातीला प्रोत्साहन मिळावे यासाठी उद्योगांसाठी असलेल्या विविध सवलती यांबाबत  सभा संपन्न झाली.खासदार संजय मंडलिक यांच्या प्रयत्नातून नव्याने स्थापन झालेल्या कोल्हापूर जिल्हा एक्स्पोर्ट प्रोमोशन कमिटीची पहिलीच बैठक आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली.
यावेळी सर्वप्रथम इंजिनिअरिंग एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सीलचे प्रादेशिक संचालक रजत श्रीवास्तव यांनी जगभरातील विविध देशांना भारतातून तसेच राज्यातील विविध जिल्हयातून विविध उत्पादनांची निर्यातीसाठी मोठया संधी उपलब्ध असलेची माहिती दिली. कोल्हापुरातील उत्पादकांनी निर्यात वाढवण्यासाठी जास्तीत जास्त संशोधन आणि विकासावरती भर देवून नवनवीन उत्पादने तयार करावीत आणि निर्यात करावी असे आवाहन केले.
जिल्हाधिकारी दौलत देसाईसोा यांनी याबाबतचा सविस्तर डाटा एकत्र करून एक कमिटी स्थापन करून याव्दारे निर्यात वाढविणेसाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हा उद्योग केंद्रास दिल्या.  तसेच आवश्यक असलेली माहिती तयार करणेसाठी उद्योजक, उत्पादक यांना जिल्हा उद्योग केंद्राव्दारे फाॅर्म पाठविले जातील त्यामध्ये उत्पादकांनी त्यांची सर्व माहिती भरून जिल्हा उद्योग केंद्राकडे त्वरीत पाठवावी असे आवाहन महाव्यवस्थापक श्री.सतिश शेळके यांनी केले. आमदार चंद्रकांत जाधवसोा यांनी, शासकीय अधिका-यांनी उद्योजक व निर्यातदारांच्या विविध समस्यांचा अभ्यास करून शासनाकडे याचा सातत्याने पाठपुरावा करावा तसेच आवश्यक असलेली माहिती येथील औद्योगिक असोसिएशन कडून तुम्हाला दिली जाईल असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!