
कोल्हापूर : कोल्हापूरच्या जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथकाचे काम राज्यात आदर्श असून किर्लोसकर ऑईल इंजिन लिमिटेडच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक सीपीआरच्यावतीने राबविण्यात येत असलेला संवेदना कार्यक्रम एचआयव्ही बद्दल समाजात जनजागृती करण्याच्यादृष्टीने अंत्यत महत्वपुर्ण असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले. यावेळी किर्लोसकर आईल इंजिन्स लिमिटेडच्या वतीने देण्यात येणारा किर्लोसकर सामाजिक बांधिलकी पुरस्कार शिरोळचे राजन रामन पदुशेरी यांना प्रदान करण्यात आला.
दिनांक 20 ते 28 जानेवारी दरम्यान संवेदना – वेध शुन्य गाठण्याचा हा जनजागृती कार्यक्रम कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात राबविण्यात आला आहे. या कार्यक्रमाची सांगता व पुरस्कार वितरण समारंभ येथील शाहू स्मारक भवन येथे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, अभिनेते स्वप्निल राजशेखर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटु अनुजा पाटील, किर्लोसकर ऑईल इंजिनचे कार्यकारी संचालक कृष्णा गावडे, डॉ. आर. एस. आडकेकर, डॉ. आर. बी. मुगडे, प्रभारी अधिक्षक जिल्हा शासकीय रुग्णालयचे डॉ. देशमुख, जिल्हा एड्स नियंत्रण पथकाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपा शिपुरकर, डॉ. एल. एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोल्हापूर जिल्हा अनेक बाबतीत वैशिष्ट्यपुर्ण आहे. या जिल्ह्याला राजर्षि शाहू महाराजांचा वारसा लाभला आहे. सहकार क्षेत्र, कोल्हापूर टाईप बंधारा ही या जिल्ह्याची देण आहे असे असले तरी राज्यात एड्सचे प्रमाण जास्त असलेल्या व दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण कमी असलेल्या राज्यातील दहा जिल्ह्यात कोल्हापूरचा समावेश असणे ही बाब दुर्दैवी आहे. पण आता एचआयव्हीबाबत जनजागृती मोठ्याप्रमाणात करण्यात येत असून शुन्य गाठण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे एड्सचे प्रमाण कमी होईल असा विश्वास डॉ. सैनी यांनी व्यक्त केला. महाविद्यालयीन युवक युवतींमध्ये एचआयव्ही बाबत मोठ्याप्रमाणात जनजागृती होणे आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. एड्स नियंत्रणामध्ये जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक आणि वारंगना यांचे योगदान महत्वपुर्ण असल्याचे सांगून संवेदना टीमचे काम अत्यंत उत्कृष्ट आहे. किर्लोसकर ऑईल इंजिनसारखे अन्य उद्योगांनीही सामाजिक बांधिलकी जपण्यास प्रशासनाला मदतीचा हात दिल्यास जिल्ह्यातील नकारात्मक बाबी नक्कीच कमी होतील. असा विश्वासही डॉ. सैनी यांनी व्यक्त केला. किर्लोसकर आईल इजिन्सच्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांचा आणि पुरस्कार विजेते राजन रामन पदुशेरी यांच्या कार्याचा गौरव डॉ. सैनी यांनी केला
Leave a Reply