कोल्हापूर :जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणाच्या माध्यमातून गेल्या पाच दिवसापासून आयोजित केलेल्या ताराराणी महोत्सवात सहभागी झालेल्या 196 बचतगटांच्या उत्पादनांची 34 लाखाची विक्री झाली असून आज या महोत्सवाचा समारंभपुर्वक समारोप करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता बचत गटाकडून उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन अर्थात ताराराणी महोत्सव येथील प्रायव्हेट हायस्कूल ग्राऊंडच्या मैदानात आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाचा समारोप जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती ज्योती पाटील, बांधकाम सभापती सीमा पाटील, समाज कल्याण समितीचे सभापती किरण कांबळे, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले , श्री आबिटकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. एच. टी. जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. या समारंभात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंद्रजित देशमुख यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
ताराराणी महोत्सवामध्ये जिल्ह्यातील तसेच अन्य जिल्ह्यातील 196 बचत गटांनी सहभाग घेतला असून या पैकी जवळपास 76 बचत गट विविध खाद्य पदर्थांचे आहेत तर 120 बचत गटांनी अन्य विविध प्रकाराच्या उत्पादनाचे स्टॉल ठेवले होते. या बचतगटांच्या उत्पादनांना खाद्य पदर्थांच्या स्टॉलनां जनतेनी उर्स्फुत प्रतिसाद दिला. आज अखेर या महोत्सवात 34 लाखाची उलाढाल झाल्याची माहिती ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. एच. टी. जगताप यांनी दिली.

Leave a Reply