
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासूनच्या कामगिरीचा आढावा घेणारे ‘गाथा ग्रामविकासाची’ हे पुस्तक पंचायत राज व्यवस्थेचा एक उत्तम दस्तऐवज ठरला आहे असे प्रशंसोद्गार राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. वरिष्ठ पत्रकार समीर देशपांडे यांच्या ‘गाथा ग्रामविकासाची’ या पुस्तकाचे प्रकाशन मंत्री मुश्रीफ आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहामध्ये सव्वा दोन तास रंगलेला हा कार्यक्रम म्हणजे ग्रामविकास या विषयावरील परिसंवादच ठरला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील होते. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार जयंत आसगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.मुश्रीफ म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समित्या या लोकप्रतिनिधी घडवणारी विद्यापीठे आहेत असे यशवंतराव चव्हाण म्हणत होते. ते तंतोतंत खरे आहे. ग्रामीण विकासाचा हा आलेख अगदी बारकाईने समीर देशपांडे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून मांडला आहे. अनेक खासदार, आमदारांचे राजकीय जीवन या संस्थांच्या माध्यमातून सुरू झाले. त्याचेही चित्रण यामध्ये करण्यात आले आहे. पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, समीर देशपांडे यांनी पंचायत राज व्यवस्थेचा इतिहास प्रामाणिकपणे मांडला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद ही एक विकासाचे रोल माडेल म्हणून पुढे आली आहे. या जिल्हा परिषदेचा इतिहास, अनेकांनी केलेली कामगिरी या पुस्तकाच्या माध्यमातून चांगल्या पध्दतीने मांडण्यात आली आहे. पंचायत राज व्यवस्थेत काम करणाऱ्यांसाठी हे पुस्तक म्हणजे दीपस्तंभ ठरेल.खासदार धैर्यशील माने म्हणाले, हे पुस्तक केवळ ग्रामविकासाची माहिती देत नाही तर ज्या कर्तबगारीमुळे ग्रामीण विकासाची गंगा गावोगावी पोहोचली त्यांच्याबाबतची उत्तम माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून नव्या पीढीला मिळणार आहे. आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, जुन्या पीढीतील नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी कशा पध्दतीने जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न केले. त्याची इत्यंभूत माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून संकलित करण्यात आली आहे. जी नव्या सदस्यांसह प्रशासनालाही उपयुक्त ठरणारी आहे. ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले म्हणाले, पंचायत राज व्यवस्थेतील या संस्था कमकुवत करण्याचे प्रयत्न होत असून या संस्थांना बळकटी आणण्याची गरज आहे. तालुका, जिल्हा पातळीवर प्रश्न सुटत नसल्याने मंत्रालयात गर्दी होते हे चित्र बदलण्याची गरज आहे. उपाध्यक्ष सतीश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. समीर देशपांडे यांनी प्रास्ताविक केले तर संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते समीर देशपांडे, प्रकाशक अक्षर दालनचे अमेय जोशी, रचनाकार गौरीश सोनार यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला सभापती हंबीरराव पाटील, प्रविण यादव, डा. पदमाराणी पाटील, स्वाती सासने, गटनेते युवराज पाटील, विरोधी पक्षनेते विजय भोजे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : पत्रकार समीर देशपांडे लिखित ‘गाथा ग्रामविकासाची’ या पुस्तकाचे प्रकाशन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी उपाध्यक्ष सतीश पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.
Leave a Reply