डार्लिंग’चा धडाकेबाज ट्रेलर रसिकांच्या भेटीला…

 

अनलॉक सुरू झाल्यापासून मराठी सिनेसृष्टीत एकाच सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘डार्लिंग’ या आगामी मराठी सिनेमाच्या निर्मात्यांनी 26 जानेवारी 2021 ला सिनेमा रिलीज होणार असल्याचं घोषित करून सिनेमासृष्टीपासून रसिकांपर्यंत सर्वांचच लक्ष वेधून घेतलं. सुरूवातीला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या ‘‘डार्लिंग तू…’’ या टायटल साँगनं प्रेक्षकांची तूफान दाद मिळवल्यानंतर सध्या ‘डार्लिंग’मधील ‘‘ये है प्यार…’’ हे रोमँटिक साँग प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी होत आहे. अशा वातावरणात ‘डार्लिंग’चा धडाकेबाज ट्रेलर सिनेरसिकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळेच सिनेमातील दोन गाण्यांना मिळणा-या धमाकेदार यशानंतर ‘डार्लिंग’चा ट्रेलर जणू रसिकांना घायाळ करणार असल्याची प्रतिक्रिया निर्माता-दिग्दर्शकांकडून व्यक्त केली जात आहे.
    7 हॉर्स एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि कथाकार मोशन पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत ‘डार्लिंग’ची निर्मिती अमित धुपे, अजय ठाकूर, व्ही.  जे. शलाका आणि निखील खजिनदार यांनी केली आहे. आजवर नेहमीच वेगळ्या वाटेने जात रसिकांना काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न करणा-या दिग्दर्शक समीर आशा पाटील यांच्या नजरेतून ‘डार्लिंग’ची प्रेमकथा पहायला मिळणार आहे. उत्सुकता वाढवणा-या कथानकाला अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देत, सुरेल गीत-संगीताची पेरणी आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांचा यथोचित वापर करून हा सिनेमा बनवण्यात आला आहे. अबालवृद्धांचा लाडका अभिनेता प्रथमेश परब आणि रितीका श्रोत्री ही ‘टकाटक’ जोडी पुन्हा एकदा या सिनेमात लक्ष वेधून घेणार असून त्यांच्या जोडीला ‘लागिरं झालं जी’फेम निखिल चव्हाणही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. एका वेगळ्याच वाटेवरील तसंच आजवर कधीही समोर न आलेले विविध पैलू उलगडणारी प्रेमकथा या सिनेमात आहे. कलाकारांची उत्तम अदाकारी, गाण्यांमधील माधुर्य, ठसकेबाज संवाद आणि उत्कंठावर्धक प्रसंगांनी सज्ज असलेला ‘डार्लिंग’चा मनमोहक ट्रेलर प्रेक्षकांचं मन मोहून टाकण्यात यशस्वी होणार असं दिग्दर्शक समीर आशा पाटील यांचं म्हणणं आहे. हा सिनेमा मनोरंजनाचं एक परीपूर्ण पॅकेज तर आहेच, परंतु तरूणाईला एक सशक्त संदेश देणारा ठरेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.
    नवीन वर्षाची तेजोमय सुरूवात करण्याच्या उद्देशानं ‘डार्लिंग’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टेनट चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद आणि नाटयगृहांमध्ये हाऊसफुल्लचे फलक झळकू लागले असल्याने ‘डार्लिंग’लाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. लॉकडाऊनमुळे या वर्षात आलेली मरगळ झटकून नव्या वर्षात नव्या उमेदीनं भरारी घेण्याचं टॉनिक ही मराठमोळी ‘डार्लिंग’ सर्वांना देईल अशी खात्री सिनेमाच्या निर्मात्यांना वाटते, त्यामुळेच संपूर्ण मराठी सिनेसृष्टीचेही ‘डार्लिंग’कडे लक्ष लागले आहे. रिलिजिंग पार्टनर तसेच वितरणाची जबाबदारी पिकल एंटरटेनमेंटचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी सांभाळणार आहेत. ‘डार्लिंग’चं लेखन समीर आशा पाटील यांनी केलं असून या सिनेमात प्रथमेश परब, रितीका श्रोत्री, निखिल चव्हाण, मंगेश कदम, आनंद इंगळे इ. कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. चिनार-महेश या आजच्या काळातील आघाडीच्या संगीतकार जोडीनं चित्रपटातील गीते संगीतबद्ध केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!