कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेल्या कृषी सुधारणा कायद्याच्या विरोधात सर्व पक्षीय फेरीवाला कृती समिति निदर्शने करणार अशा स्वरूपाची बातमी आज वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाली आहे. फेरीवाला बांधवांनी या चुकीच्या आंदोलनात सहभागी होवू नये असे आवाहन भारतीय जनता पार्टी फेरीवाला संघटनेने केले आहे.
सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून व लोकशाही मार्गाने केंद्र सरकारने कृषी सुधारणा कायदे केले. कायदे करून ६ महीने झाल्यावर विरोधकांनी या कायद्याविरोधात आंदोलने सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सामान्यांची दुखणी जाणून आणि सर्व सामान्यांच्या अडचणी समजावून घेवून वेगवेगळ्या घटकांना दिलासा देणाऱ्या अनेक योजना आखल्या. कोव्हिड-१९ लॉकडाऊन काळात ज्यांचे व्यवसाय पूर्ण बंदच झाले अशा हातावरचे पोट असणाऱ्या फेरीवाल्यांसाठीही मोदी सरकारने पंतप्रधान स्वनिधी योजने मार्फत अर्थ सहाय्य केले. कोल्हापुरातील सुमारे ४५०० फेरीवाला बांधवांना याचा लाभ झाला आहे.
फेरीवाल्यांचे नेते म्हणून घेणारे कोल्हापुरातील काही कार्यकर्ते फेरीवाल्यांना हाताशी धरून त्यांचा फक्त आणि फक्त राजकीय फायद्यासाठी वापर करत आहेत. यातील काहीजणांनी तर पंतप्रधान स्वनिधी योजना फेरीवाल्यांपर्यन्त पोहोचू नये यासाठी कष्ट केल्याचे उघड झाले आहे. फेरीवाल्यांच्या नावाने आणि फेरीवाल्यांच्या ताकदीवर राजकारण करणारे हे लोक वास्तविक फेरीवाल्यांच्या हिता विरोधात काम करीत आहेत. हे फेरीवल्यांनी समजून घेणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी व देशाच्या संसदेने केलेले कृषी कायदे हे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे या आधीच सिद्ध झाले आहे. सरकारवर टिका करण्यासाठी कोणताही विषय उरला नसल्यामुळे विरोधी पक्ष जनतेची दिशाभूल करणारी आंदोलने चालवीत आहेत. अशा आंदोलनापासून फेरीवाला बांधवांनी अलिप्त राहावे असे आवाहन भाजपा फेरीवाला संघटनेचे मारुती भागोजी, नझीर देसाई, अजित ठाणेकर यांनी केले आहे.
Leave a Reply