
कोल्हापूर : सैन्य भरती प्रक्रीयेत तालुकावार नियोजन केल्यामुळे भरती प्रक्रीया निर्विघ्नपणे सुलभ पार पडली. या प्रक्रीयेसाठी कोल्हापूरने चांगले सहकार्य केले, असे उद्गार कर्नल राहूल वर्मा यांनी व्यक्त केले.महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसह गोव्यासाठी 3 फेब्रुवारीपासून शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सैन्यातील विविध पदांसाठी भरती प्रक्रीया सुरु आहे. या प्रक्रीयेच्या अंतिम टप्प्याची माहिती देताना कर्नल राहूल वर्मा म्हणाले, या सैन्य भरती प्रक्रीयेसाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी चांगले सहकार्य केले. तसेच छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, महानगरपालिका, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, व्हाईट आर्मी, कोल्हापुरातील विविध दानशूर संस्था व व्यक्ती या सर्वांच्या सहकार्यामुळे ही सैन्यभरती प्रक्रीया निर्विघ्नपणे पार पडली याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी सुभेदार मेजर जे. एस. नागरा, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे समन्वयक चंद्रशेखर पांगे उपस्थित होते.कर्नल राहूल वर्मा म्हणाले, एकूण 57 हजार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. चुकीची माहिती भरणे, दुबार नोंदणी, खाडाखोड अशा विविध कारणामुळे 12 हजार उमेदवार वगळले गेले. प्रत्यक्ष 45 हजार उमेदवार भरती प्रक्रीयेत सहभागी झाले. यामध्ये साताऱ्यातून सर्वाधिक 13 हजार, त्या खालोखाल कोल्हापूर 12 हजार, तसेच सांगलीतून 10 हजार उमेदवार भरती प्रक्रीयेत सहभागी झाले. एकूण पात्र उमेदवारांमधील 9 हजार उमेदवार टफ फाईटमध्ये, 8 हजार उमेदवार 1.6 किलोमीटर धावण्याच्या सरावात तसेच अन्य विविध कारणामुळे उमेदवार वगळले जाऊन एकूण 5 हजार उमेदवारांची अंतिम निवड झाली. या प्रक्रीयेसाठी सैन्यदलातील 125 अधिकारी, जवानांची टीम कार्यरत असून, 45 उमेदवारांचा एक वर्ग याप्रमाणे वैद्यकीय तपासणी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
वर्मा म्हणाले, अंतिमत: निवड झालेल्या या 5 हजार उमेदवारांची 24 एप्रिल व 29 मे 2016 ला वैद्यकीय परीक्षा होईल. संपूर्ण भारतात अशा प्रकारची एकत्रिकरणाची प्रकीया पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिध्द होईल. यामधून विविध पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांची बेळगाव, नाशिक, अहमदनगर या ठिकाणी असलेल्या रेजिमेंटमध्ये पाठवणी होईल. 29 व 30 जून 2016 रोजी ही प्रक्रीया समाप्त होईल. यानंतर 3 महिने, 6 महिने, 9 महिने असे कोर्स होतील. अशी ही वर्षभर चालणारी प्रक्रीया आहे. या संपूर्ण भरती प्रक्रीयेत एकूण 5 अध्याय आहेत. ते पार केल्यानंतर पात्र ठरणारे उमेदवार सैनिक म्हणून देशाच्या सेवेत रुजू होतील.
Leave a Reply