
कोल्हापूर: श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने अयोध्याला उभारण्यात येणाऱ्या श्री राम जन्मभूमीवर भव्य मंदिराचे कार्य आता गतिमान झाले आहे. पाच वर्षे चाललेला राम भक्तांचा संघर्ष यशस्वी होऊन ९ नोव्हेंबर २०१९ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय दिला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत १५ ऑगस्ट २०२० रोजी श्री राम जन्मभूमीच्या जागी भूमिपूजन करण्यात आले आहे. या प्रस्तावित तीन मजली मंदिरासाठी संपूर्ण भारतातून भक्तांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी मकर संक्रांति पासून ‘निधी समर्पण अभियान’ संपन्न होत आहे. या अभियानाअंतर्गत देशातील चार लाख गावातील ११ कोटी कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा मानस आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली.
आर्थिक पारदर्शकता राहावी म्हणून रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने रुपये 1 हजार, 100 रुपये आणि दहा रुपयांच्या कुपन व पावती पुस्तकांची रचना करून त्या माध्यमातून अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय ऑनलाईन निधी समर्पण व्यवस्थाही करण्यात आली आहे. या अभियानाकरिता विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने सर्व रामभक्त जाती, मत, पंत संप्रदायातील असतील. अशा सर्वांच्या सहयोगाने हे राष्ट्रीय महाअभियान होणार आहे. महाराष्ट्रात हे अभियान १५ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत होणार असून या अभियानाच्या माध्यमातून चाळीस हजार गावातील व शहरी भागातील सर्व वस्तीतून अडीच कोटी कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. या अभियानामध्ये दोन हजार संत व दोन लाख रामभक्त कार्यकर्ते सहभागी होतील, असेही मिलिंद परांडे यांनी सांगितले. राम मंदिर उभारण्यासाठी देशातील प्रत्येकाचा सहभाग असावा. हा उद्देश या अभियानामागील आहे. पत्रकार परिषदेला पपु.भगीरथ महाराज यादव, रणजीतसिंह घाटगे, अनिरुद्ध कोल्हापुरे, विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply