
मुंबई, दि. 18 : ‘मेक इन इंडिया सप्ताहा’च्या माध्यमातून देशभरात सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली असून राज्यातील सर्वच विभाग आणि सर्वच क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक होणार आहे. 30 लाख नवीन रोजगार या माध्यमातून निर्माण होणार असल्याने राज्याच्या मागास भागांचा औद्योगिक विकास साध्य होणार आहे. ‘मेक इन इंडिया’ आजपासून मिशन म्हणून सुरू झाले असून या सप्ताहामध्ये झालेले सर्व सामंजस्य करार प्रत्यक्षात येण्यासाठी राज्य शासन टास्क फोर्स नेमणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मेक इन इंडिया सप्ताहाच्या समारोपप्रसंगी बोलताना केले.
वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर उभारण्यात आलेल्या ‘मेक इन इंडिया’ सेंटरमध्ये सप्ताहाच्या समारोपानिमित्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाचे सचिव अमिताभ कांत, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, केंद्रीय सचिव रमेश अभिषेक, सहसचिव श्री. अतुल चतुर्वेदी, किर्लोस्कर लिमिटेडचे संजय किर्लोस्कर, जेसीबी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन सोधी, सीआयआयचे अध्यक्ष चंद्रदीप बॅनर्जी, एशियन पेंटस्चे जलज दाणी आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे यजमानपद महाराष्ट्राला मिळाले ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. या सोहळ्याच्या आयोजनासाठी उद्योग विभागासह सर्वांनीच एक टीम म्हणून कामगिरी पार पाडली. त्याचे फलित म्हणून महाराष्ट्रात या सप्ताहाअंतर्गत 2594 सामंजस्य करार झाले. एकूण 8 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि तीस लाख नवीन रोजगारांची निर्मिती या माध्यमातुन होणार आहे.
Leave a Reply