
कोल्हापूर : गेली बारा वर्षे कोल्हापूरच्या प्रबोधनपर सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला ‘शिव-महोत्सव’ (शिवाजी विद्यापीठ आजी माजी विद्यार्थी स्नेहमेळावा) शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्र सभागृहात सुरू होत आहे. शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समिती, विद्यार्थी कल्याण मंडळ, ग्रीन माईंड क्रिएटर्स फाऊंडेशन, सांगली व सार्थक क्रिएशन्स, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा प्रथमच हा महोत्सव दोन दिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे संकल्पक डॉ. प्रविण कोडोलीकर व महोत्सव समिती अध्यक्ष डॉ. चांगदेव बंडगर यांनी दिली आहे. या महोत्सवानिमित्त आजपासून शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीस विद्युत रोषणाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आज सायंकाळी ५.३० वाजता संदीप खरे व सलील कुलकर्णी यांच्या सुप्रसिद्ध ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाने १३व्या शिव-महोत्सवास सुरवात होईल. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते व बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिव-महोत्सवाचे उद्घाटन होईल.
उद्या सकाळी ११ ते २ या कालावधीत ‘ॲन अनुप जत्राटकर मल्टिमीडिया प्रोडक्शन्स’च्या सहकार्याने ‘लघुपट महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. शिव-महोत्सवात यंदा प्रथमच हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कोल्हापुरातील युवा दिग्दर्शकांच्या १५ लघुपटांचे एकत्रित प्रदर्शन करणारा हा या परिसरातील पहिलाच महोत्सव ठरणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्या हस्ते व प्रसिद्ध कवी डॉ. राज होळकर यांच्या उपस्थितीत होईल.
रविवारी सायंकाळी ४.३० वाजता प्रमुख शिव पुरस्कार वितरण समारंभ व भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी श्रीमती नागरबाई शिंदे, तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे असतील. यावेळी परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी.के. गायकवाड, विजय पोवार, शिवाजीराव परुळेकर, प्राचार्य मोहन राजमाने, प्राचार्य डॉ. वसंत हेळवी, प्राचार्य राजेंद्र शेजवळ, प्राचार्य डॉ. घोलप, सहा. पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे, डॉ. प्रतिभा गायकवाड, संजय पवार, संदीप देसाई, प्रा. शहाजी कांबळे, प्रा. मच्छिंद्र सकटे, प्रमोद कराड, रोहित पाटील, मंदार पाटील, सौ. स्मिता माने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Leave a Reply