
मुंबई : महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाच्या समितीचे शासनाने पुनर्गठन केले असून, या समितीच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची धुरा पुन्हा राजेश क्षीरसागर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. दि.१७ जून रोजी राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आजतागायत ते या पदावर कार्यरत आहेत.
विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य नियोजन मंडळ वगळता सर्व समित्या शासनाने बरखास्त केल्या होत्या. परंतु, राज्य नियोजन मंडळ सुरूच ठेवले होते. या राज्य नियोजन मंडळ, मुंबई यांचे शासनाने दि.०९ मार्च रोजीच्या शासन आदेशान्वये पुनर्गठन केले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या या समितीच्या “कार्यकारी अध्यक्ष” पदावर राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. यासह त्यांना या पदास “मंत्री दर्जा” देण्यात आला आहे. यासह मंत्री दर्जास अनुज्ञेय कार्यालय, सुरक्षा, कर्मचारी, वाहन आदी सुविधा त्यांना देण्यात आल्या आहेत. मंत्रालय समोरील प्रशासकीय इमारती मध्ये १८ व्या मजल्यावर या समितीस कार्यालय देण्यात आले आहे. या समितीमध्ये उपाध्यक्ष पदावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह समिती सदस्य म्हणून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी, नियोजन राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह शासकीय अधिकारी काम पाहतील. राजेश क्षीरसागर हे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात.
यावर प्रतिक्रिया देताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, राज्य नियोजन मंडळ, नियोजन विभाग, महाराष्ट्र राज्य हा मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील एक महत्वपूर्ण विभाग असून, नियोजन आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे राज्य आणि जिल्हा पातळीवर पंचवार्षिक योजना आणि वार्षिक योजना तयार करण्याचे काम या विभागाचे प्रमुख कार्य आहे. यासह मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत मानव विकासावर आधारीत योजना राबविणे याकरिता रु.४०० कोटी निधी वितरणाचे अधिकार पुढील काळात मिळणार आहेत. यामाध्यमातून राज्याचा विकास साधण्याचा, विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Leave a Reply