सतर्क राहून कोरोनाबाबत नियोजन करावे: ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

 

कोल्हापूर : सर्व यंत्रणांनी सतर्क राहून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियोजन करावे, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कोल्हापूर महानगरपालिकेने स्वतंत्र बैठक घेऊन नियोजन करावे तसेच सीपीआरने पुन्हा एकदा यंत्रणा सक्रिय करावी, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. तर बंद असणारे सीपीआरमधील व्हेंटिलेटर्स दुरूस्त करून घ्यावेत, अशी सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली.जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती राजर्षी शाहूजी सभागृहात कोरोना आजार प्रतिबंध उपाययोजना व लसीकरण आढावा बैठक आज घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, वैद्यकीय रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे आदी उपस्थित होते.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली. ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, एप्रिलअखेर संभाव्य वाढणारी रूग्णसंख्या लक्षात घेऊन त्याबाबत नियोजन तयार ठेवावे. कोव्हिड काळजी केंद्र सुरू करावेत. मरगळ झटकून सर्व यंत्रणा सतर्क करावी. खाटांची संख्या कमी पडणार नाही याबाबत तयारी ठेवावी. लक्षणे दिसताच तपासणी करावी, याबाबत प्रबोधन करावे.
विनामास्क नागरिकांवर पोलीसांनी कारवाई करावी, असे सांगून श्री. मुश्रीफ म्हणाले, कारखानदारांची बैठक घेऊन कामगारांच्या लसीकरण आणि आरटीपीसीआर तपासणीबाबत नियोजन करावे. त्याबाबत पत्रव्यवहार करावा.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, सीपीआरमधील वार्डामध्ये उपलब्ध खाटांच्या माहितीसाठी मोबाईल देण्यात आले होते. ते रिचार्ज करून पुन्हा सक्रिय करावेत. प्रत्येक तालुका किंवा भाग घेऊन त्याबाबत कोव्हिड काळजी केंद्राची तयारी ठेवावी. संभाव्य वाढीव रूग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्ह्यात रेमडीसीवीरचा साठा ठेवावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने आपली जबाबदारी पार पाडावी. महापालिका हद्दित रिक्षा फिरवून जनजागृती करावी. त्याचबरोबर खाटांची संख्या उपचार घेणारे रूग्ण याबाबत स्वतंत्र अधिकारी नियुक्त करून नियंत्रण ठेवावे. पोलीस विभागाने गृहरक्षक दल मागणीबाबत प्रस्ताव पाठवावा.
सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर म्हणाले, सीपीआरमध्ये उपचारासाठी मोठ्या संख्येने रूग्ण येत असतात. त्याबाबत सीपीआर प्रशासनाने यंत्रणा सतर्क ठेवावी. खाटांची कमतरता भासणार नाही याबाबत योग्य नियोजन करावे. बंद असणारे व्हेंटिलेटर्स तात्काळ दुरूस्त करून घ्यावेत.
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे कोव्हिड काळजी केंद्र सुरू करत आहोत. याशिवाय महापालिका शहरात सुरू करत आहे. सद्यस्थितीत आणि संभाव्य रुग्णसंख्या गृहित धरून नियोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!