
कोल्हापूर : कोकण व गोव्याला जावयाचे झाल्यास आजरा – आंबोली या रस्त्याला जवळचा मार्ग म्हणून पाहिले जाते. या मार्गावर पर्यटकांची नेहमीच वर्दळ होत असल्याने पर्यटन, व्यापारासह उद्योग धंदा वाढीकरीता चालना मिळावी व वाहतुकीसोबत वेळेची बचत व्हावी यादृष्टीने खासदार संजय मंडलिक यांनी केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांचेकडे संकेश्वर ते बांदा दरम्यान 108 किमी रस्त्याते दुहेरीकरण व्हावे अशी मागणी केली असता संकेश्वर ते आंबोली फाटा दरम्यानच्या 61 किमी च्या रस्त्याकरीता 574 कोटी रु. मंजूर झाल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना खासदार मंडलिक म्हणाले, गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असून कोकणामध्येही पर्यटन मोठ्या प्रमाणात आहे. याठिकाणी कर्नाटक, महाराष्ट्रातून तसेच देश विदेशातून पर्यटक येत असतात व गोवा आणि कोकणात जावयाचे झाल्यास आजरा – आंबोली मार्ग हा जवळचा मार्ग म्हणून पाहिले जाते. सध्या या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ होत असून वाढती वाहतूक लक्षात घेता या रस्त्याला महामार्गाला दर्जा देवून या रस्त्याचे दुहेरीकरण व्हावे अशी मागणी खासदार मंडलिक यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांचेकडे केली होती.
यामहामार्गामुळे महाराष्ट्र व कर्नाटकातील दूध, फळे, भाजीपाला, उद्योगासाठी लागणारा कच्चा-पक्का माल हा रेड्डी पोर्टवरुन इतरत्र देशभर पाठविणे शक्य होणार असल्याने केंद्रसरकारच्या अर्थसंकल्पीय निधीतून संकेश्वर – गडहिंग्लज – कोवाडे – आजरा – गवसे – आंबोली दरम्यानच्या या 61 किमी रस्त्याकरीता भू-संपादनासह रस्त्याच्या बांधणीकरीता 574 कोटी रु. मंजूर झाले आहेत तर आंबोली ते बांदा दरम्यानच्या रस्त्याकरीता आवश्यक असणारा निधी पुढील आर्थिक वर्षात मंजूर होणार असल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी पुढे दिली.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील संकेश्वर पासून हा महामार्ग सुरु होणार असून तो पुढे मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गास जोडणारा समांतर असा होणार असल्याने या रस्त्यावरुन मोठी वाहतूक होणार असल्याकारणाने या रस्त्याला मोठे महत्व येणार आहे, असेही खासदार मंडलिक म्हणाले.
Leave a Reply