
कागल :गेल्या वर्षभरात दारिद्र्यरेषेखालील २१ कर्त्या कुटुंब प्रमुखांचे मृत्यू झाले. त्या कुटुंबांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाला उशीर झाल्याबद्दल माता- भगिनींनो, मी सरकारच्यावतीने माफी मागतो, असे भावनिक उदगार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.कागलमध्ये राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील २१ कुटुंबाना अर्थसहाय्याचे वाटप झाले. यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्यानंतर कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळतो. मुलाबाळांच्या शिक्षणासह प्रापंचिक घडीच विस्कटते. म्हणून मी विशेष सहाय खात्याचा मंत्री असताना अशा कुटुंबाला वीस हजार रुपये अर्थसहाय्याची योजना काढली होती. तालुक्यातील २१ कुटुंबावर असा आघात होऊनही कोरोनामुळे हे अनुदान मिळाले नव्हते. कारण, कोरोना महामारीमुळे एक लाख ५३ हजार कोटींची तूट सरकारला आली आहे. त्यामुळे; काही योजना मागे ठेवाव्या लागल्या होत्या. परंतु; सततच्या पाठपुराव्यामुळे यामध्ये यश आले.”मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरात विधवा माता-भगिनी या कुटुंबाना मागणी करूनही अनुदान मिळत नव्हते. याचे दुःख आहेच. परंतु; कोरोनाची परिस्थिती पुन्हा उद्भवली असतानाही सरकारने अशा कुटुंबांना दिलासा दिला, याचा आनंदही वाटतो. हाच धागा पकडत तहसीलदार सौ. शिल्पा ठोकडे म्हणाल्या, मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील व राज्यातील अशा कुटुंबांनाही हे अनुदान मिळाले आहे.”*
Leave a Reply