
कोल्हापूर : सध्यस्थितीत जगभरात कोरोना साथीने थैमान घातले आहे. कोरोना रोगाचा फैलाव थांबविण्याकरिता केंद्र शासन व राज्य शासन प्रयत्नशील आहे. गतवर्षीचे लॉकडाऊन आणि सध्याची लॉकडाऊन सदृश्यस्थिती पाहता नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. अशात राज्यातील अनेक व्यवसाय, व्यवहार ठप्प आहेत. यामुळे मजूर, नोकरदार, व्यावसायिक. व्यापारी अशा सर्वच वर्गाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यातून सर्वच नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार विविध बँकांनी कर्जदारांना हप्ते भरण्यासाठी सवलत देऊ केली आहे. पण, शासन निर्देश डावलून कोल्हापूर जिल्ह्यातील फायनान्स कंपन्याकडून कर्जदारांकडून कर्जाच्या हप्त्यांच्या वसुलीकरिता तगादा सुरु आहे, फायनान्स कंपन्यांचा वाढता मनमानी कारभारावर प्रशासनाने आळा घालावा, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी श्री.दौलत देसाई आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.शैलेश बलकवडे यांच्याकडे केली.
या निवेदनात पुढे म्हंटले आहे कि. वास्तविक शासनाच्या निर्देशानुसार कर्जाचा हप्ता भरण्यास शासनाने व रिझर्व बँकेने मुभा दिली असताना कर्जदारांकडे फायनान्स कंपन्याकडून कर्जाचे हप्ते भरण्यास दबाव आणला जात आहे. सध्या कदम बजाज शोरूम येथील दुचाकी गाडीवरील कर्जाचा एकच हप्ता राहिल्याने बजाज फायनान्स या कंपनीने हप्ता वसुलीसाठी सकाळी – सकाळी नेमलेल्या एजन्सीचा कर्मचारी कर्जदाराच्या घरी पाठविल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये फायनान्स कंपनीच्या मॅनेजर अभिजित पाटील यांना सदर ग्राहकाने फोन लावून जाब विचारला, वसुली साठी आलेल्या कर्मचाऱ्याकडे कंपनीचे ओळखपत्र देखील नसल्याचे निदर्शनास येते. कर्जदारांना फोन करणे, घरी जावून धमकावण्याचेही प्रकार घडत आहेत. नियमबाह्य आणि गुंडगिरीने होणारी ही वसुली अत्यंत गंभीर असून, फायनान्स कंपन्याच्या मनमानी कारभारात वाढ होत आहे.
तुटपुंजे उत्पन्न असणारे अनेकजण विविध कारणांसाठी कर्ज घेतात. ज्यांना राष्ट्रीयकृत बँकाकडून कर्ज उपलब्ध होत नाही असे लोक नाईलाजाने खाजगी फायनान्स कंपन्यांचा आधार घेतात. या अव्वाच्या सव्वा व्याज दराने घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरताना सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला येतो. सध्या तर लॉकडाऊन स्थितीमुळे अनेकांचे उत्पन्नाचे मार्ग बंद आहेत. मात्र, खाजगी फायनान्स कंपन्या कोणताही मुलाहिजा न ठेवता पठाणी व्याजदराने हप्ते वसुली करताना दिसत आहेत. दरमहा हप्ता न भरल्यास तब्बल २४ ते ४८ टक्के व्याज आकारण्याची धमकी देवून बळजबरीने हप्ते वसूल करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. शासनाने दिलेल्या निर्देशास न जुमानता ही सक्तीची कर्जवसुली सुरूच आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने फायनान्स कंपन्याद्वारे आर्थिक लुटीच्या तक्रारी वाढत आहेत. तरी याप्रकरणी शासनाने गांभीर्याने लक्ष घालून फायनान्स कंपन्याकडून होणाऱ्या जाचक, नियमबाह्य हप्ते वसुलीवर कडक कारवाई करून नागरिकांना होणारा मानसिक त्रास, उर्मट वागणूक, आर्थिक लुबाडणूक थांबविण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली.
यावेळी शिवसेनेचे उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, सुनील जाधव, किशोर घाटगे, विभागप्रमुख राजू काझी, युवा सेना जिल्हा सरचिटणीस अविनाश कामते उपस्थित होते.
Leave a Reply