
कागल:घरकुल संकुलामध्ये गोरगरिबांचा ग्रहप्रवेश हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, असे भावनिक उदगार ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. पुण्याई ही शिदोरी संपूर्ण आयुष्यभर पाठीशी राहील, असेही ते म्हणाले.कागल शहरातील गणेश नगरमध्ये नागरिकांना एक हजार घरकुलांचे वाटप मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. मंत्री मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने हा प्रकल्प तडीस नेला आहे. बाजार मूल्यानुसार बारा ते पंधरा लाख रुपये किंमत होणाऱे हे घरकुल अवघ्या ५० हजारात मिळाले आहे. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. माणिक रमेश माळी होत्या.संकुलातील नागरिकांनी मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासह प्रमुख मान्यवरांचे टेरेसवरून पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत केले. घरकुल संकुला समोरील गुढीचे पूजन मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले व घरकुलातील नागरिकांसोबतच मंत्री श्री. मुश्रीफ यांनीही पुरणपोळीचा आनंद लुटला.यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, कागल शहरात राहणाऱ्या प्रत्येकाला स्वतःच्या हक्काचे घर मिळाले पाहिजे, हे स्वप्न बघितले होते. या घरकुलात राहून मुलाबाळांचे चांगले शिक्षण पूर्ण करा आणि जीवनमान उंचवा. राहिलेली अडीचशे घरेही दसऱ्यापर्यंत पूर्ण करून देऊ.
Leave a Reply