रेमडीसीवीरचा काळाबाजार रोखून आर्थिक लुट थांबविण्यासाठी सर्व रुग्णालयांची बैठक घ्यावी : राजेश क्षीरसागर  

 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून, मोठ्या प्रमाणात रेमडीसीवर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रेमडीसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करून रुग्णांची व नातेवाईकांची आर्थिक लुट होत असून, यास आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची तातडीची बैठक घ्यावी, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी श्री.दौलत देसाई यांना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सूचना करताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर जिल्ह्यात रेमडीसीवर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काही रुग्णालयात रेमडीसीवर इंजेक्शनची आवश्यकता नसणाऱ्या रुग्णांनाही रेमडीसीवर इंजेक्शन देण्यात येत आहे. हे या तुटवड्याचे प्रमुख कारण आहे. यामुळे गरजू असलेल्या रुग्णांवर इंजेक्शन अभावी मृत्यु ओढावण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरजू असणाऱ्या रुग्णांनाच रेमडीसीवर  इंजेक्शन देण्यात यावे. वाढती मागणी आणि होणारा पुरवठा याचा ताळमेळ बसत नाही आहे. महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यांच्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यास रेमडीसीवर इंजेक्शनचा होणारा पुरवठा नाममात्र ०.७४ टक्के इतका अत्यल्प आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आवश्यक पुरवठा होण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करावा. रेमडीसीवर इंजेक्शनच्या तुटवड्याचा फायदा काही विघ्नसंतोषीकडून घेतला जात असून, अवाढव्य किंमती आकारून रुग्णांची व नातेवाईकांची आर्थिक लुट करण्यात येत आहे. हे थांबणे गरजेचे आहे. भयावह परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्याचे काम प्रशासनाने करणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खाजगी रुग्णालये, महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत येणारी रुग्णालये यांची तातडीची बैठक घेवून, रेमडीसीवर इंजेक्शनचा तुटवडा व काळाबाजार यास आळा घालण्यासाठी सूचना प्रशासनाने द्याव्यात.
यासह कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये कोल्हापूर शहरामध्ये जंबो कोव्हीड सेंटर उभे करावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. आजची परिस्थिती पाहता रोज हजारांच्या संख्येत रुग्णांची वाढ होत आहे. ही परीस्थिती प्रशासनाच्या आवाक्याबाहेर जावू नये यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने जबाबदारी घेवून दसरा चौक येथे स्वतंत्र तपासणी केंद्र उभे करावे. या केंद्रातून रुग्णांचे विलगीकरण करून, अत्यावश्यक रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे आणि सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर होम क्वारंटाईन किंवा अलगीकरण केंद्राच्या माध्यमातून उपचार करावेत. त्याचबरोबर टेंबलाईवाडी येथे आयआरबी कंपनीस दिलेल्या पाच एकर जागेत इमारत उभी असून ती विनावापर आहे. या इमारतीमध्ये कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून जंबो कोव्हीड सेंटर उभारण्याची जबाबदारी स्विकारावी, अशी सूचना केली.
जिल्हाधिकारी श्री.दौलत देसाई यांनी, रेमडीसीवर इंजेक्शन संदर्भात तातडीने जिल्ह्यातील रुग्णालयांची बैठक आयोजित करण्याची सूचना मान्य केली. यासह रेमडीसीवर इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची विनंतीही .राजेश क्षीरसागर यांना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!