
कोल्हापूर: जरगनगर येथील भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने आज जागतीक पुस्तक दिवस संपन्न झाला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या टेंबलाईवाडी विद्यामंदीर, नेहरुनगर विद्यामंदीर या दोन शाळांना ग्रंथालयाचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांचे हस्ते वाचनीय पुस्तके देण्यात आली.
जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन दरवर्षी २३ एप्रिल रोजी साजरा केला जातो. वर्ल्ड बुक कॅपिटल २०२० मलेशियाची राजधानी असलेलं क्वालालंपूर आहे. युनेस्को आणि त्यासंबंधित संस्था जगभरात जागतिक पुस्तक दिन साजरा करतात. लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दीष्ट आहे.
आज भालचंद्र चिकोडे ग्रंथालयांमध्ये पुस्तकांचा स्तंभ उभा करण्यात आला. ग्रंथालयाचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांनी सर्वप्रथम सर्वांना पुस्तक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना ग्रंथालयाचे अध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, ब-याच वेळेला आपण म्हणतो की वाचाल तर वाचाल, पुस्तके वाचली पाहिजेत म्हणून आजच्या या पुस्तक दिनाच्या निमित्याने सर्वांनी आज वाचनाच संकल्प केला पाहिजे. वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी अर्थाच्या शोधात, पॉपीलॉन, अमृतवेल, अग्निपंख, ययाती, डेझर्टर, एका तेलियाने, अल्बर्ट एलिस, न लिहिलेले पत्र अशी पुस्तके सर्वांसाठी
वाचनीय आहेत तर महिलांसाठी परवाना, ब्रेडविनर, शौझीया, कथा लंडनच्या आजीबाईची, नॉट विदाऊट माय डॉटर, समिधा अशी पुस्तके जरूर वाचली पाहिजेत.
पुस्तक वाचनामुळे सध्याच्या या तणावपुर्ण युगामध्ये जीवन तणावरहित होण्यासाठी मोठी मदत होत आहे. पुस्तके ही सकारात्मक विचार येण्यासाठी मार्गदर्शक असतात. पुस्तके जीवनात अमुलाग्र बदल घडवतात, आपल्याला आयुष्य जगायला शिकवतात. ग्रंथालयाच्या माध्यमातून सर्व वयोगटातील वाचकांसाठी भरपूर पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. ग्रंथालयाच्या माध्यमातून सातत्याने वाचन संस्कृती वाढीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये लहान मुलांना संध्याकाळी पाच ते सात या वेळेत मोफत वाचनालय त्याचबरोबर पुस्तकांची वारी आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून विविध शाळांच्या पटांगणावर जाऊन मुलांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी पुस्तकांची गाडी उभी केली जाते.
आज पुस्तक दिनाच्या निमित्ताने सर्वांनी आज पासून सर्वांनी वाचण्यास सुरुवात केली पाहिजे व नवीन छंद, कौशल्य प्राप्त करून तणावमुक्त जीवन जगण्यासाठी तयार राहिले पाहिजे असे आवाहन ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी
केले.याप्रसंगी नेहरूनगर विद्यालयाचे संजय पाटील सर टेंबलाईवाडी विद्यालयाचे विलास पिंगळे सर, सचिन साळुंखे, जयदीप मोरे, कृष्णा आतवाडकर, विजय पाटील, शंतनु मोहिते, अक्षय निरोखेकर, सिद्धार्थ तोरस्कर आदी उपस्थित होते.
Leave a Reply