
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीला स्थगिती मिळावी या आशयाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. मंगळवारी झालेलय सुनावणीप्रसंगी निवडणूक कार्यक्रम सुरू ठेवण्याचा आदेश दिला. यामुळे गोकुळची निवडणूक ठरल्याप्रमाणे दोन मे रोजी होणार हे स्पष्ट झाले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मतदान केंद्राची संख्या वाढणार आहे.
‘गोकुळ’निवडणूक ही सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडी आणि विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी यांच्यासाठी कमालीची प्रतिष्ठेची ठरली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे निवडणुकीला स्थगिती मिळावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात दोन संस्थांनी दाखल केली होती. सोमवारी, ता. २६ एप्रिल रोजी या याचिकेवरील सुनावणी झाली नव्हती.
या सुनावणीकडे संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागले होते. मंगळवारी ता. २७ एप्रिल रोजी या याचिकेवर सुनावणी झाली. उदय उमेश ललित व ऋषीकेश रॉय दोन न्यायाधीशांच्या कोर्टासमोर सुनावणी झाली. याप्रसंगी याचिकाकर्त्यांच्यावतीने कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव, कोरोनामुळे काही ठरावधारक बाधित झाले आहेत यासंबंधीची माहिती देण्यात आली. तसेच कोरोनामुळे दोन ठरावधारकांचा मृत्यू झाल्याचेही कोर्टाच्या निदर्शनास आणले. राज्य सरकारच्यावतीनेही म्हणणे सादर करण्यात आले. राज्य सरकारर्फे बाजू मांडताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन संबंधित यंत्रणा निवडणूक घेत असल्याचे सांगण्यात आले. सुप्रीम कोर्टाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे अंमलबजावणी आणि आवश्यक त्या सगळया नियमावलींचे पालन, सुरक्षितता यासंबंधी म्हणणे ऐकून घेत निवडणूक घ्यायला अडथळा नसल्याचे स्पष्ट केले. निवडणूक घेत असताना मतदान केंद्राची संख्या दुप्पट करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांने गोकुळ निवडणुकीसाठी सोमवारी, ता. २६ एप्रिल रोजी जिल्ह्यात ३५ मतदान केंद्रांची यादी घोषित केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आता मतदान केंद्राची संख्या दुप्पट वाढणार आहे.
Leave a Reply