
कोल्हापूर: गोकुळ’च्या कारभारावर विरोधकांनी कितीही टीका केली तरी आम्ही चांगला कारभार केला आहे. पारदर्शी कारभार, दूध उत्पादकांचा विश्वास आणि उत्तम व्यवस्थापन यामुळे गोकुळ दूध संघाच्या ४५० कोटी रुपयांच्या ठेवी केल्या आहे. या ठेवींच्या जोरावरच आम्ही लॉकडाऊन काळात दूध उत्पादकांना दूधाचा दर दिला. उत्तम कारभारामुळे दूध उत्पादक सत्ताधारी आघाडीच्या बाजूने असून आमचा विजय निश्चित आहे, असा विश्वास सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीचे नेते आमदार पी.एन. पाटील यांनी व्यक्त केला.
सत्ताधारी आघाडीला जिल्ह्यातून मोठा पाठींबा मिळत असून माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलेल्या पाठींब्यामुळे आमचा विजय निश्चित आहे असे सांगून आमदार पी.एन. पाटील यांनी लवकरच आणखीन एक मोठा नेता पाठींबा देणार आहे, असे सूचक विधान आमदार पाटील यांनी केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्ताधारी शाहू आघाडीला पाठींबा दिला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘खासदार शेट्टी यांची शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे मिळावेत अशी भावना आहे. गोकुळच्या सत्ताधारी आघाडीने चांगला कारभार करत दूध उत्पादकांना न्याय दिला आहे. त्यांना आर्थिक स्थैर्य दिले आहे. गोकुळच्यावतीने सुविधाही पुरवल्या जातात. सत्ताधारी आघाडीने केलेल्या चांगल्या कामांमुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठींबा दिला आहे.
गोकुळची निवडणूक पुढे जावी यासाठी सत्ताधारी आघडीतील मी किंवा महादेवराव महाडिक कधीच कोर्टात गेलो नाही. उलट राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलल्या असताना गोकुळची निवडणूक घ्यावी म्हणून विरोधी आघाडी कोर्टात गेली होती याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले. सध्या करोनाचे रुग्ण वाढत आहेत. गोकुळचे ४० मतदारांना करोनाची लागण झाली आहे. एक मतदार गंभीर आहे. दोघांचा मृत्यू झाला आहे. तरीही गोकुळची निवडणूक व्हावी, अशी विरोधकांची इच्छा आहे.
करोनाचा काळात निवडणूक पुढे ढकलली असती तरी चालली असती तरीही कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही निवडणूक लढवण्यास तयार आहोत. गोकुळचे मतदार आणि वाढीव ३५० मतदार हे आमचेच असल्याने आमचा विजय निश्चित आहे,असा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
गोकुळ चा कारभार हा पारदर्शक आहेच.ही निवडणूक भ्रष्टाचार विरुद्ध शिष्टाचार अशी होणार आहे.सतत खालच्या पातळीवरची टीका विरोधकांकडून होत आहे. विरोधकांच्या हातात सत्ता गेली तर संघाचा राजकीय अड्डा व्हायला वेळ लागणार नाही असे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
मल्टिस्टेटला माझा नेहमीच विरोध होता आणि कायम राहील. ज्यादा दूध दरासाठी आम्ही गोकुळ विरोधात आंदोलन केले पण चांगला दूध दर देऊन गोकुळ ने ही सहकाराची भूमिका पार पाडली. असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी नमूद केले. सत्तारूढ पॅनेल प्रचंड मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
पत्रकार परिषदेला संजयबाबा घाटगे, अरुण नरके, प्रा. जालंदर पाटील, भगवान काटे, सावकार मदनाईक आदी उपस्थित होते
Leave a Reply