
कोल्हापूर: निसर्ग संवर्धनाचा संदेश सर्वच धर्मांनी दिलेला आहे. तथापि सर्व प्राणिमात्रांप्रती भूतदया आणि मानवतावादी दृष्टीकोन बाळगणे हा सर्वोच्च व सर्वोत्कृष्ट धर्म आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. जय सामंत यांनी केले. ‘धर्म आणि पर्यावरण – विशेष संदर्भात जैन धर्म’ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा सांगता समारंभ आज शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात पार पडला. ज्येष्ठ विचारवंत डॉ. जे. एफ. पाटील अध्यक्षस्थानी होते.
डॉ. जय सामंत यांनी जागतिक स्तरावर विविध धर्मांच्या व्युत्पत्तीबद्दल विवेचन केले. सर्व धर्मांमध्ये निसर्ग संवर्धनाचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरुवातीला वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. एस. आर. यादव यांनी ‘वनस्पती आणि माणूस’ या विषयावर मार्गदर्शन केले. पश्चिम घाटातील विविध प्रकारच्या वनस्पतींचे महत्व त्यांनी सांगितले. स्थानिक प्रजातींचे संगोपन ही सध्याची महत्वाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. जे.एफ. पाटील यांनी ‘निसर्ग आणि धर्म’ यांच्यामधील सहसंबंधाचे विवेचन केले. पृथ्वीवरील निसर्ग हाच देव असून त्याचे सर्व धर्मांनी संरक्षण व संवर्धन करण्याचे तत्व प्रतिपादन केल्याचे त्यांनी सांगितले. आधुनिक शास्त्रज्ञांनी देवकणांचे संशोधन केले, जे आपण आजपर्यंत धर्मामध्ये मांडत आलो आहोत. सर्व धर्मामध्ये सांगितलेली पंचमहाभूते व त्यांचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
Leave a Reply