
कोल्हापूर :दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरात येत्या आज पासुन खेट्यांना प्रारंभ झाला.त्यासाठी जोतिबा डोंगर सज्ज झाला आहे. माघ महिन्यात जोतिबाचे पाच खेटे घातले जातात. त्या नंतर जोतिबाची चैत्र पोर्णिमेला यात्रा भरते.यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांतून लाखो भाविक येतात. या दिवशी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होतील. “श्रीं’ची अलंकारयुक्त महापूजा बांधली जाते. खेट्यांच्या पार्श्वभूमीवर डोंगरावर सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. रात्रीपासूनच डोंगरावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जोतिबाच्या खेड्यांना पहाटे चारपासून प्रारंभ होतो. कुशिरे, पोहाळे तर्फ आळते, गायमुख तलाव येथील डोंगरवाटेतून पहाटे पायी चालत जाऊन खेटे पूर्ण करतात. “जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने डोंगरपठारे दुमदुमून जातात. पंढरपूर, सोलापूर, सांगली, कऱ्हाड भागातील काही भाविक आपली वाहने गायमुख तलावावर लावून पायी डोंगराकडे जातात. त्यामुळे गायमुख तलावास जत्रेचे स्वरूप येते. ग्रामपंचायतीने स्वच्छता, पिण्यासाठी मुबलक पाणी देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला आहे.
खेटे म्हणजे काय?
माघ महिन्यात पाच रविवारी जोतिबा डोंगरावर भरणाऱ्या यात्रेस जोतिबाचे खेटे म्हणतात. या रविवारी भाविक शक्यतो अनवाणी चालत येतात. यामध्ये महिला भाविकांची संख्याही लक्षणीय असते.
खेट्यांची आख्यायिका
पूर्वी केदारनाथ (जोतिबा) आपली दक्षिण मोहीम संपवून हिमालयाकडे जाण्यास निघाले. हे करवीर निवासनी श्री महालक्ष्मी देवीस कळताच ती अनवाणी कोल्हापूरहून डोंगरावर आली व तिने केदारनाथांना जाऊ नये, असे विनवले. तेव्हा केदारनाथांनी वाडी रत्नागिरीवर (जोतिबा डोंगर) राहण्याचे मान्य केले. तेव्हापासून पायी खेटे घालण्याची प्रथा सुरू झाली.
Leave a Reply