साधना केल्यास मनोबल वाढून संकटांचा सामना करण्याचे बळ प्राप्त होते:स्वाती खाडये

 

कोल्हापूर: मागील वर्षापासून चालू झालेल्या कोरोना संसर्गाच्या संकटामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. राष्ट्रासमोर कोरोना संकटासह ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतर’, ‘महिलांवरील अत्याचार’, ‘भ्रष्टाचार’ अशी अन्य संकटेही आहेत. अशा प्रकारच्या संकटांचा सामना करण्यासाठी धर्माचरण करणे आणि साधना करणे हेच पर्याय आहेत. देवाचा भक्त बनण्यासाठी साधना करणे आवश्यक असते. साधना केल्याने मनोबल वाढून कोणत्याही संकटांचा सामना करण्याचे बळ प्राप्त होते. कलियुगात ‘नामस्मरण’ ही महत्त्वपूर्ण साधना आहे. काळानुसार योग्य साधना कशी करावी, तसेच धर्माचरणाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणारे ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षण वर्ग आणि ‘धर्मसत्संग’ यांमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. त्या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ‘तणावमुक्त जीवन आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ व्याख्यानात बोलत होत्या.
हिंदु जनजागृती समितीचे संघटक श्री. मनोज खाडये यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. शंखनादाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वेदिका पालन यांनी व्याख्यानाचा उद्देश स्पष्ट केला. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा राज्यातील ८ सहस्रपेक्षा अधिक राष्ट्रप्रेमी जिज्ञासू या व्याख्यानात सहभागी झाले होते.
न्याय, बंधुत्व आणि समानता यांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी हिंदु राष्ट्र हाच पर्याय मनोज खाड्ये, संघटक, हिंदु जनजागृती समिती
स्वातंत्र्यानंतर जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणवून घेणारे आपण स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतर या देशात काही राज्यात समांतर नक्षलवाद्यांचे होणारे काही भाग, ३ सहस्र ५०० पेक्षा अधिक विदेशी आस्थापनांद्वारे भारताची होणारी लूट, गोधनाची संख्या केवळ १ कोटीवर येणे यांसह अनेक गोष्टी पहाता सर्वांत मोठी अपयशी लोकशाही असेच दुर्देवाने म्हणावे लागेल. देशाच्या अर्थसंकल्पात ५ सहस्र २९ कोटी रुपयांची तरतूद केवळ अल्पसंख्यांसाठी केली जाते. काशी विश्‍वविद्यालयाच्या अभ्यासक्रमातून रामायण-महाभारत यांचा अभ्यासक्रम वगळला जातो, तर अलीगड मुस्लीम विद्यापिठात फाळणीला कारणीभूत महंमद अली जीनाचे चित्र लावण्यात येते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात अल्पसंख्याकांना वारेमाप झुकते देऊन हिंदूंचे कायम दमन करण्यात आले. त्यामुळे न्याय, बंधुत्व आणि समानता यांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी हिंदु राष्ट्र हाच पर्याय आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीचे संघटक श्री. मनोज खाडये यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!