तावडे हॉटेल येथील स्वागत कमान महानगरपालिकेकडे हस्तांतरीत होणार:आ.चंद्रकांत जाधव यांची यशस्वी शिष्टाई

 

कोल्हापूर: आमदार चंद्रकांत जाधव यांच्या सुचनेनुसार भारती एक्स्पो अॅडसने स्वागत कमानीवर राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीचा बोर्ड झळकवला.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीच्या तावडे हॉटेल येथील स्वागत कमानीवर जाहिरातीचे होर्डिंग बघून करवीर नगरीतील विविध सामाजिक संस्था, तालमी यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन यांना निवेदने देऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन व प्रवेशद्वार जाहिरात कंपनी यांची संयुक्त मीटिंग बोलवून चर्चेने सदर प्रश्न निकाली काढला आहे. कोल्हापूरात प्रवेश करणाऱ्या तावडे हॉटेल येथील स्वागत कमान महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात येणार असून, महापालिकेच्यावतीने कमानीचे लवकरच सुशोभिकरण केले जाईल, अशी माहिती आमदार चंद्रकांत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महापालिकेचे इस्टेट विभागाचे सचिन जाधव, भारती एक्स्पो अॅडसचे मानस मंडलिक उपस्थित होते.
शहरात प्रवेश करतात त्या कमानीवर लावण्यात आलेल्या जाहिरात फलकावरून सोशल मीडियावर टीकेला सुरूवात झाली आहे. कमानीवर जाहिरातीचा फलक मोठा आणि कोल्हापूर महापालिकेचे नाव लहान अक्षरात आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सोशल मीडियाद्वारे अनेकजण हा मुद्दा उपस्थित करत असून आमचा जाहिरातीला विरोध नाही, मात्र कोल्हापूरचा प्रवेशद्वार असलेल्या कमानीवर ठळकपणे मोठ्या अक्षरात कोल्हापूर हे नाव दिसले पाहिजे. याबाबत सर्वजण आपली मते व्यक्त करत आहेत. काहीजण तर या प्रवेशद्वारावर जाहिरातच नको, अशा प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. त्यामुळे आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज स्वागत कमानीचे ठेकेदार भारती एक्स्पो अॅडसचे मानस मंडलिक व महापालिकेचे इस्टेट विभागाचे सचिन जाधव यांची बैठक घेऊन चर्चा केली आणि लोकभावनेचा आदर करून जाहिरात उतरावी अशी सूचना केली. आमदार जाधव यांच्या सूचनेनुसार स्वागत कमानीवरील जाहिरात उतरवून, त्याठिकाणी शाहू नगरीत स्वागताचा बोर्ड लावण्याचे ठेकेदाराने मान्य केले होते.
तसेच जाहीरात फलकाबाबत पुन्हा वादाचा प्रसंग येऊ नये, यासाठी कमान महापालिकेकडे हस्तांतरीत करावी, असा प्रस्ताव आमदार जाधव यांनी ठेकेदराकडे ठेवला, त्यास भारती एक्स्पो अॅडसचे मानस मंडलिक यांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे ही स्वागत कमान लवकरच महापालिकेकडे हस्तातंरीत करण्यात येणार असून, महापालिकेच्यावतीने कमानीचे लवकरच सुशोभिकरण केले जाईल, अशी माहिती आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिली.
ठेकेदार कंपनीचे मानस मंडलिक म्हणाले, मीही शाहू प्रेमी आहे ; मात्र सोशल मिडीयावरील वादामुळे व्यथित झालो होतो. आमदार जाधव यांनी संपर्क साधून, मला धीर दिला. आमदारांच्या प्रस्तावानुसार कमान महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यास मी तयार आहे.पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने व महानगर पालिका या स्वागत कमानीचे दगडी स्लायडिंगव्दारे शुभोभिकरण करणार आहे, असेही आमदार जाधव यांनी सांगितले.उद्या होणाऱ्या शाहू जयंतीच्या पूर्वसंध्येला प्रवेशद्वारावर राजर्षी छत्रपती शाहू जयंतीचा फलक लावल्याबद्दल समस्त शाहूप्रेमी जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!