
कोल्हापूर : पती-पत्नीच्या नात्यावर वेगळ्या पद्धतीने भाष्य करणारा ‘अनुराग’ हा मराठी चित्रपट ११ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. लग्नानंतर अनेक वर्षांनी छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांच्यात दुरावा येत जातो आणि त्यांच्या नात्यात घुसमट निर्माण होऊ लागते.त्यावर त्या जोडप्याने कसा मार्ग काढला की त्यांचे नाते संपवले याची उत्कंठा लावणारा एक भावस्पर्शी चित्रपट म्हणजे अनुराग. आतापर्यंत पती-पत्नीच्या नात्यातील पैलू अनेक चित्रपटातून दाखविण्यात आले आहेत.पण यापलीकडे जाऊन या नात्याचा वेगळा विचार या चित्रपटात मांडला आहे यामुळेच हा चित्रपट वैशिष्टपूर्ण ठरतो असे दिग्दर्शक डॉ.अंबरीश दरक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पती-पत्नीच्या नात्यातील पदर उलघडणाऱ्या या चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि धर्मेंद्र गोहिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.तब्बल १८ हजार फुटावरील लेह-लडाख येथे चित्रपटाचे चित्रीकरण झाले असून लेह-लडाखच्या भौगोलिक परिस्थितीनुसारच चित्रपटातील कथानकाचा भाव प्रकट होतो.हा चित्रपट पहायला येणारा प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्यासाठी काही ना काहीतरी नक्कीच घेऊन जाईल असे सह दिग्दर्शिका आणि प्रमुख भूमिकेत असलेल्या मृण्मयी देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.गुरु ठाकूर यांनी गीत लेखन,समिर म्हात्रे यांचे संगीत लाभले आहे.नात्याचा पुन्हा शोध घेण्यासाठी हा चित्रपट प्रेक्षकांनी नक्कीच पाहिला पाहिजे असे दिग्दर्शक डॉ.अंबरीश दरक म्हणाले.
Leave a Reply