कोल्हापूर: सराफ व्यवसायावर एक टक्का एक्साईज ड्यूटी लागू केल्याच्या निषेधार्ध उद्यापासून तीन दिवस सराफ बाजार बंद राहणार असल्याची माहिती व्यावसायिकांच्या बैठकीत देण्यात आली.
केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये एक्साईज ड्यूटी लागू केल्याचे घोषित केले आणि याची अंमलबजावणी आजपासून लागू झाली. याचा विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सराफ व्यावसायिकांची कोल्हापूर सराफ व्यापारी संघ येथे शहर अध्यक्ष सुरेश गायकवाड आणि जिल्हा अध्यक्ष भरत ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अर्थसंकल्पामध्ये व्यवसायावर एक टक्का एक्साईज ड्यूटी लागू केली आहे. शिवाय दोन लाखांवरील खरेदीवर टीडीएस लागू केला आहे पॅनकार्ड सक्ती तर अगोदरच लागू केली आहे. स्थानिक कर तर आम्ही अगोदरच भरत आहोत. याचा आम्ही सर्व सराफ व सुवर्णकार विरोध करीत आहोत. यामुळे सर्वच व्यावसायिकांना व्यवसाय करणे कठीण होणार आहे. त्यानुसार उद्यापासून (ता. २, ३ व ४) तीन दिवस व्यवसाय बंद करणार आहोत. यावेळी चार्टर्ड अकौंटंट चेतन ओसवाल आणि हितेश गुंदेशा यांनी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
दरम्यान, या बैठकीअगोदर जेम्स अँड ज्वेलरी फेडरेशनच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये देशातील जवळपास १८०० संघटनांचा बंदला पाठिंबा असल्याचे या पदाधिकाऱयांनी सांगितले. यावेळी कुलदीप गायकवाड, राजेश राठोड, सुरेश ओसवाल, महेंद्र ओसवाल, सुहास जाधव, किरण गांधी, शिवराज पोवार, संपत पाटील असे शहर संघटनेचे पदाधिकारी, तर माणिक जैन, जितेंद्रकुमार राठोड, गजानन बिल्ले (राधानगरी), सतीश भोजे (हुपरी), बाबूराव जाधव (हुपरी), संजय पाटील (हुपरी), राजेश वेसणेकर (आजरा), प्रकाश बेलवलकर (जयसिंगपूर), स्वप्नील शहा (कागल), दीपक वेर्णेकर (गडहिंग्लज) आणि अशोक झाड असे कोल्हापूर जिल्हा सराफ संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply