
कोल्हापूर : शहरातील प्रत्येक प्रभागात कोरोना लसीकरण शिबीराचे आयोजन करुन, ४५ वर्षावरील नागरिकांचे कोरोना लसीकरण येत्या दहा ते बारा दिवसात पूर्ण करा. खेळाडूंना विशेषबाब म्हणून लस द्या, तसेच कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची भीती लक्षात घेऊन, कोल्हापूर शहरातील लसीकरण वेगाने पूर्ण करा, अशा सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनास दिल्या. तसेच ज्यांनी आद्याप लस घेतलेली नाही, त्यांनी शिबीरात लस घ्यावी असे आवाहन आमदार जाधव यांनी जनतेला केले आहे.आमदार चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत आज कोल्हापूर शहरातील कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला.कोल्हापूर शहरात दररोज साडेपाच हजार नागरीकांना कोरोनाची लस देण्यात येते. १८ वर्षावरील नागरिकांना ऑनलाईन बुकींग करून लस दिली जाते तर ४५ वर्षावरील नागरिकांना तात्काळ बुकींग करून लस दिली जात आहे. आतापर्यंत ४५ वर्षावरील ८० टक्के म्हणजे सुमारे एक लाख ८० हजार नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती लसीकरण अधिकारी डॉ. अमोल माने यांनी दिली. शहराला प्रत्येक आठवड्याला दहा ते बारा हजार लस उपलब्ध होत असल्याचे उपआयुक्त निखिल मोरे यांनी सांगीतले.आमदार जाधव म्हणाले, कोरोना साथीच्या विरूद्ध लसीकरण मोहिम वेगाने पूर्ण करणे गरजेचे आहे. विशेषतः ४५ वर्षावरील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण होणे गरजेचे आहे. यामुळे आशा स्वयंसेवीकांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागाचा सर्वे करा व ४५ वर्षावरील लस न घेतलेल्या नागरिकांची यादी तयार करा. त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी दररोज आठ प्रभागामध्ये शिबीराचे आयोजन करा. ज्यांनी आद्याप लस घेतलेली नाही त्यांनी शिबीरात लस घ्यावी. म्हणजे येत्या दहा ते बारा दिवसात ४५ वर्षावरील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण होईल.खेळाडूंना लसीकरणामध्ये प्राधान्य द्या अशी सूचना देताना, शहरात केएसएमार्फत १६ फुटबॉल संघातील सुमारे ३५० व ज्युनियर संघातील सुमारे १४०० खेळाडूंना स्पॉट बुकिंग करून लस देण्याचे नियोजन करा अशी सुचना आमदार जाधव यांनी दिली.लस देताना कोरोना चाचणीची सक्ती करू नका ; मात्र कोरोनाची लक्षण असणाऱ्या नागरिकांला लस देताना कोरोना तपासणी करा अशी सूचना आमदार जाधव यांनी दिली.लसीकरणाचे काम प्रभावीपणे राबवून शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत प्रत्येक प्रभागात शिबीराचे आयोजन करा. शिबीरासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार जाधव यांनी दिले.कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरण पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्यांनी आद्याप लस घेतलेली नाही, त्या सर्वांनी शिबीरात लस घ्यावी असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.उपायुक्त निखिल मोरे, संदीप घार्गे, शिल्पा दरेकर, प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, लसीकरण अधिकारी डॉ. अमोल माने, प्रशांत पंडत आदी उपस्थित होते.
Leave a Reply