
कोल्हापूर:गेल्या काही दिवसांपासून महापालिका कॉन्ट्रॅक्टर या व्हाट्सअप्प ग्रुपवरील संदेश सगळीकडे व्हायरल झाला. ‘काम देताना जे ठरलंय ते करायचं, जास्त लांबड लावायची नाही’ असा एकप्रकारे इशाराच ठेकेदारांना दिला गेला. महानगरपालिकेच्या विकासकामात चालत असणाऱ्या टक्केवारी पद्धतीचे पितळच या संभाषणातून उघडे पडले. या टक्केवारी पद्धतीचा विरोध करण्यासाठी आम आदमी पार्टीने महानगरपालिकेसमोर ‘हंडी फोड’ आंदोलन केले. दुपारी बाराच्या सुमारास ‘आप’चे पदाधिकारी व कार्यकर्ते महापालिकेसमोर जमा झाले व त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. ‘टक्केवारी थांबवा, महापालिका वाचवा’, ‘ढपला संस्कृती बंद झालीच पाहिजे’, ‘टक्केवारीत सामील असलेल्या कारभाऱ्यांचा धिक्कार असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. टक्केवारीची हंडी सजवून 18% असा उल्लेख त्यावर केला गेला होता.तब्बल 18% रकमेचा उल्लेख व्हायरल झालेल्या संभाषणात आहे. अशाप्रकारे जनतेचा पैसा लुबाडून ‘ढपला’ संस्कृती रूढ करत शहराचे नाव बदनाम केले जात आहे. अशा प्रवृत्तीला वेळेस आळा घातला गेला नाही तर कोल्हापुरात एकही प्रकल्प पूर्णत्वास जाणार नाही. 2009 साली सुरू झालेली नगरोत्थान योजना, अमृत योजना, थेट पाईपलाईन योजना अशा अनेक योजना टक्केवारीमुळे अर्धवट राहिल्या. या प्रवृत्तीला आम आदमी पार्टी कायम विरोध करत राहील” असे ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.यावेळी युवाध्यक्ष उत्तम पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, आदम शेख, विशाल वठारे, राज कोरगावकर, प्रथमेश सूर्यवंशी, मयूर भोसले, किशोर खाडे, विजय हेगडे, बसवराज हदीमनी, संतोष चलवंदी, भाग्यवंत डाफळे, सुधाकर शिंदे, प्रकाश हरणे, विजय भोसले, आदी उपस्थित होते.
Leave a Reply