
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी बारा महिने भाविकांचा ओघ असतो. भाविक व पर्यटकांची सोय व्हावी यासाठी दिवगंत आमदार चंद्रकांत जाधव यांनी स्वतःच्या मालकीची जाधव इंडस्ट्रीज, महापालिका व रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मंदिर परिसरात अद्यावत स्वच्छतागृह प्रकल्प तयार केला होता. या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे, हीच अण्णांना श्रद्धांजली ठरेल, असे मत रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीचे अध्यक्ष उदय दीक्षित यांनी व्यक्त केले.
महालक्ष्मी मंदिर परिसरात अद्यावत स्वच्छतागृह प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
उदय दीक्षित म्हणाले, या प्रकल्पासाठी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी बहुमोल सहकार्य केले आहे. या प्रकल्पासाठी आण्णांनी स्वतःच्या कंपनीतून निधी दिला. तसेच प्रकल्प सर्व सोयीनयुक्त व गुणवत्तापूर्ण असावा यासाठी बारकाईने लक्ष दिले होते. आज त्याची उणिव भासत आहे. आमदारसाहेबांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करणे हीच, त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न आण्णांनी पाहिले ; मात्र दुर्देवाने त्यांचे अकाली निधन झाले. त्यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज पर्यंत जशी आण्णांना साथ दिलात, तसेच पाठबळ मलाही द्यावे अशी अपेक्षा श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केली.
यावेळी रोटरीचे गौरेशजी धोंड, संजय काका जाधव, अनुप पाटील, ओंकार जाधव, महेंद्र चव्हाण, आदिल फरास, अमित माटे, बाळासाहेब कडोलकर, बाबा जांभळे, मानसिंग पावसकर, महेश ढवळे, संजय गांधी निराधार योजना समितीचे कोल्हापूर शहर अध्यक्ष नरेंद्र पायमल, अमित जाधव आदी उपस्थित होते.
Leave a Reply