
एबीसी क्रिएशन प्रस्तुत डॉ. आशिष आग्रवाल निर्मित आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘भारत माझा देश आहे’ हा देशभक्तीपर चित्रपट येत्या ६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टरने वाढवलेल्या उत्सुकतेनंतर ‘भारत माझा देश आहे’चा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात देशाच्या सीमेवर सुरू झालेली लढाई ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून सर्वांच्या घराघरात पाहायला मिळत आहे. ही बातमी पाहून सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या घरच्यांची होत असलेली तळमळ या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. कोल्हापूरातील ज्या सैनिक टाकळी गावात हा चित्रपट चित्रित झाला, त्याच गावात ‘भारत माझा देश आहे’चे टीझर प्रदर्शित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कोल्हापूरच्या ए. सी. एच. एस. ऑफिसर इन्चार्ज कर्नल विलास सुळकुडे, माजी सैनिक कल्याण मंडळाचे अध्यक्ष ऑ. लेफ्ट. बी. एस. पाटील, लोकनियुक्त सरपंच हर्षदा विनोद पाटील, गाव कामगार पोलिस पाटील सुनिता राजेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या व्यतिरिक्त या कार्यक्रमात चित्रपटातील कलाकार, महाराष्ट्रातील पत्रकार आणि सैनिक टाकळी गावातील ग्रामस्थांचा सहभाग होता. देशसेवेत आपले अमूल्य योगदान देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांशी यावेळी पत्रकारांनी, कलाकारांनी संवाद साधला. काही सैनिकी कुटुंबीयांचा यावेळी सत्कारही करण्यात आला. या वेळी सुट्टीवर आलेल्या काही सैनिकांकडून सीमेवरील अनुभवही ऐकता आले.
दिग्दर्शक पांडूरंग जाधव म्हणतात, ” हा देशभक्तीवर आधारित चित्रपट असला तरी या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला सैनिक सीमेवर तैनात असताना त्यांच्या कुटुंबियांच्या मनातील भीती, घालमेल दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या चित्रपटाची कथा मनाला स्पर्शून जाणारी आहे. देशसेवेवर आधारित हा चित्रपट असला तरी यातून सामाजिक संदेशही देण्यात आला आहे. सर्वांनाच विचार करायला लावणारी ही कथा आहे. चित्रपटाचा टीझर इथे प्रदर्शित करण्याचा मुख्य हेतू म्हणजे हे एक असे गाव आहे, जिथे प्रत्येक घरातील व्यक्ती देशसेवेत रुजू आहे. त्यामुळे हा चित्रपट आम्ही या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना समर्पित करत आहोत. अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता होती अखेर आता टीझर प्रदर्शित झाला असून लवकरच चित्रपटही प्रदर्शित होईल. आज टिझरच्या निमित्ताने मी आवाहन करतोय की, प्रत्येक पाल्याने आपल्या पालकांसोबत हा चित्रपट नक्की पाहावा.मनोरंजनाबरोबरच सत्य परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे.” या चित्रपटाची कथा पांडुरंग जाधव यांनीच लिहिली असून या चित्रपटाला समीर सामंत यांचे गीत लाभले असून अश्विन श्रीनिवास यांनी संगीत दिले आहे. तर निशांत नाथाराम धापसे यांची पटकथा, संवाद आहेत. निलेश गावंड यांनी ‘भारत माझा देश आहे’चे संकलन केले असून छायांकन नागराज यांनी केले आहे. या चित्रपटात राजविरसिंह राजे गायकवाड आणि देवांशी सावंत या बाल कलाकारांसह मंगेश देसाई, शशांक शेंडे, हेमांगी कवी,छाया कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी पिकल एंटरटेनमेंटने सांभाळली आहे.
Leave a Reply