
कोल्हापूर:“दूध उत्पादक शेतकरी सभासदांनी मोठया विश्वासाने गोकुळची सूत्रे सत्ताधारी आघाडीकडे सोपविली आहेत.गोकुळमधील सत्ताबदलानंतरच्या कालावधीत सत्ताधारी आघाडीने दूध उत्पादकांच्या हिताचा कारभार केला आहे. गेल्या पंधरा महिन्याच्या कालावधीत संघाकडून म्हैस दूध खरेदी दरात ६ रुपये व गाय दूध खरेदी दरात ४ रुपये विक्रमी अशी वाढ केली आहे. दूध उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवून कारभार सुरू आहे. आम्ही दबाव टाकणारे नाही तर दूध उत्पादकांचे हित साधणारे आहोत’असा प्रतिटोला कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा संचालिका श्रीमती अंजना रेडेकर यांनी लगाविला.
संचालिका रेडेकर म्हणाल्या, शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या वार्षिक सभेच्या ठिकाणावरुन सत्ताधारी आघाडीवर केलेली टीका निरर्थक आहे. महासैनिक दरबार हॉल येथे पहिल्यांदा गोकुळची सर्वसाधारण सभा होत नाही.यापूर्वीही २६ सप्टेंबर २०१४ रोजी संघाची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा महासैनिक दरबार हॉल येथे झाली आहे. शिवाय २९ सप्टेंबर २०१३ रोजी ही ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व दि.०४ मार्च २०१३ इ.रोजी विशेष सर्वसाधारण सभा शाहू सांस्कृतिक भवन मार्केट यार्ड कोल्हापूर या ठिकाणी घेण्यात आली होती. पूर्वी नोव्हेंबर मध्ये सहकारी संस्थाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा होत होत्या पण ९७ व्या घटना दुरुस्ती सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा या ३० सप्टेंबर पूर्वी घेण्यास कायद्यानुसार बंधनकारक आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून खुल्या जागेत सभा घेतली असता सभासदांची गैरसोय होऊ शकते या कारणास्तव संघाच्या ताराबाई पार्क ऑफिस पासून जवळच असलेल्या बंदिस्त व पुरेशी बैठक व्यवस्था असलेला महासैनिक दरबार हॉल येथे सभेचे ठिकाण निवडण्यात आले आहे. ही वस्तुस्थिती आहे.
आमचा कारभार चोख आहे.महाडिक यांची टीका खोडून काढताना संचालिका श्रीमती रेडकर पुढे म्हणतात,‘कसबा बावडा हे कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकाण आहे.गोकुळचे कार्यक्षेत्र कोल्हापूर जिल्हा आहे.सभासदांची गैरसोय होणार नाही याचा विचार करून सभेचे ठिकाण निश्चित केले आहे. यापूर्वीही वेगवेगळ्या ठिकाणी अपरिहार्य कारणास्तव सभा इतर ठिकाणी घेण्यात आल्याची उदाहरणे आहेत. शिवाय महासैनिक दरबार हॉल हे काही खासगी मालमत्ता नाही. तर हे ठिकाण जिल्हा माजी सैनिक कार्यालय कोल्हापूर यांचे आहे.’
Leave a Reply