दहावीत ९४.६० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याने केल्या १० घरफोड्या

 

कोल्हापूर : इयत्ता दहावीमध्ये तब्बल ९४. ६० टक्के गुण मिळवलेला एक अत्यंत हुशार मुलगा आज घरफोड्या आणि मोटारसायकली चोरत असल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे.अवधूत इश्वरा पाटील असे या घरफोड्याचे नाव असून, त्याचे वय अवघे १९ वर्षे आहे. केवळ चैनीसाठी त्याने तब्बल १० घरफोड्या केल्या असून, २ मोटारसायकलीही चोरल्या आहेत. त्यामुळे अवधूतला गजाआड करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ओएलएक्सपे बेच दे…. या टॅग लाईनचा अवधूतने चोरीचा माल खपविण्यासाठी मोठ्या खूबीने वापर केल्याचेही पुढे आले आहे.अवधूत भूदरगड तालुक्यातील देऊळवाडी येथील रहिवाशी आहे. अवधूत हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला हुषार मुलगा आहे. त्याची आई अंगणवाडी शिक्षिका, तर मोठा भाऊ सत्यवंत हा पुण्यातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तसेच त्याची बहीणही बीएससी झाली आहे. कौटूंबिक पार्श्वभूमी शैक्षणिक असल्याने अवधूतलाही लहानपणापासूनच शिक्षणाची गोडी लागली होती. त्यामुळे गावातील प्राथमिक महाविद्यालयात इयत्ता चौथीमध्ये शिकत असताना शिष्यवृत्तीपरिक्षेमध्ये ३०० पैकी २९८ गुण मिळवून अवधूतने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला होता.तर इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत ३०० पैकी २४६ गुण मिळवून राज्यात बारावा क्रमांक मिळवून तो गुणवत्ता यादीत झळकला होता. इतकच काय तर इयत्ता दहावीमध्ये अवधूतने ९४. ६० टक्के गुण मिळवून आपली बौध्दिक चमक दाखवून दिली होती. त्यामुळे त्याची गावातही प्रचंड वाहवाही झाली. त्यानंतर इयत्ता ११ वी साठी अवधूत एमबीबीएस डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून कोल्हापूरातल्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयात दाखल झाला. आणि शहरात तो भाड्याच्या खोलीत राहू लागला. दरम्यान त्याला त्याच्या आई–वडिलांनी खर्चासाठी दिलेले १००० रुपये आणि त्याच्याकडे असणारा त्याच्या भावाचा मोबाईल कोणीतरी चोरुन नेला. याचा अवधूतला फार राग आला आणि त्याने रागापोटी चोऱ्या करण्यास सुरुवात केली आणि इथूनच त्याच्या गुन्हेगारी दुनियेची सुरुवात झाली.महाविद्यालयात इतर मुले महागडे मोबाईल, दुचाकी, चारचाकी गाड्या घेऊन महाविद्यालयात यायची, महागडे पोशाख परिधान करायची. मात्र अवधूत चालत महाविद्यालयात जायचा, त्याच्याकडे महागडे पोशाख नव्हते. चैनीसाठी पैसे नव्हते. याची त्याला लाज वाटू लागली आणि त्याला अभ्यासाऐवजी घरफोड्यातच गोडी वाटू लागली. सुरुवातीला अवधूतने नोकरीच्या निमित्ताने एकत्रित राहणाऱ्या आपल्याच मित्रांचे आपल्याच रुममधून २ मोबाईल चोरले आणि ते ओएलएक्स वरती खोटे अकौंट तयार करुन ते ३२०० रुपयांना विकले. त्यामुळे कमी श्रमात मिळालेल्या पैशामुळे भारावून जात, अवधूतने चोऱ्या आणि घरफोड्यांचा धडाका लावला. मोबाईल, लॅपटॉप, पाकीट चोरता–चोरता अवधूतने घरांचे, फ्लॅटचे, कडी कोयंडे उचकटण्यास सुरुवात केली. त्याच्यावर गेल्या ६ महिन्यांच्या कालावधीत तब्बल १० घरफोडींचे गुन्हे दाखल झाले. तसेच गोवा आणि सावंतवाडी येथून चोरलेल्या २ मोटारसायकलींच्या चोरीप्रकरणीही गुन्हा दाखल झाला आहे. आणि हे सर्व गुन्हे त्याच्याकडून उघडकीस आले आहेत. अवधूतकडून आत्तापर्यंत चोरीस गेलेल्या १२ लाख ७५ हजार २५ रुपये, किमतीच्या मुद्देमाला पैकी १ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली, ६ लाख ५२ हजार ४६० रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे, १८ हजार ८६५ रुपये किमतीचे चांदीचे दागिणे, ८८ हजार रुपये किमतीचे ७ मोबाईल, १ लाख ८२ हजार रुपये किमतीचे ७ लॅपटॉप असा एकूण ११ लाख ३६ हजार ३२५ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यामुळे एंकदरीतच या घटनेने पालकांनी आता आपल्या पाल्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जाते.

 

 

IMG_20160423_121924

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!