
मुंबई : पॅकबंद वस्तूंची (आवेष्टित) छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणे, त्यावर योग्य माहिती न छापणे आणि प्रवासी साहित्याचे वजन करणारी सदोष वजन मापके आदी तक्रारींच्या प्रकरणी वैधमापन यंत्रणेच्या विशेष पथकाने राज्यातील चार विमानतळावर धडक कारवाई करून विविध आस्थापनांवर एकूण 16 खटले दाखल केले आहेत राज्यातील मुंबई, नागपूर,औरंगाबाद व पुणे येथील विमानतळावर पॅकबंद वस्तूंची (आवेष्टित) छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करत असल्याच्या तसेच प्रवाशांचे सामानाचे वजन करणाऱ्या सदोष यंत्राबाबतच्या तक्रारी वैध मापन यंत्रणेकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत वैध मापन नियंत्रक तथा विशेष पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी चारही विमानतळावर काल एकाच दिवशी विशेष तपासणी मोहिम राबविली होती. या तपासणीदरम्यान दोषी आढळलेल्या आस्थापनांवर 16 खटले दाखल केले आहेत.
विमानतळावरील दुकानांमध्ये पॅकबंद वस्तूवर योग्य माहिती न छापल्याप्रकरणी मुंबई विमानतळावरील 3,पुणे विमानतळावरील 3, औरंगाबाद विमानतळावरील 2 आणि नागपूर विमानतळावरील एका दुकानावर खटला दाखल करण्यात आला आहे. तसेच छापील किमतीमध्ये खाडाखोड केल्याप्रकरणी औरंगाबाद विमानतळावरील एका दुकानावर खटला दाखल करण्यात आला आहे. तसेच विमानतळावरील प्रवाशांचे सामानाचे वजन करणाऱ्या यंत्रामध्ये दोष आढळल्याप्रकरणी एकूण चार खटले दाखल करण्यात आले असून त्यामध्ये नागपूर विमानतळावरील मे. मिहान इंडिया प्रा. लि. यांनी विहित मुदतीत फेरपडताळणी व मुद्रांकन न केल्याप्रकरणी तसेच प्रमाणीत वजने न ठेवल्याप्रकरणी दोन खटले दाखल करण्यात आले आहेत. तर पुणे विमानतळ प्राधिकरणाने प्रमाणीत वजन न ठेवल्याप्रकरणी एक खटला दाखल करण्यात आला आहे.
Leave a Reply