
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाने आपल्या सामाजिक बांधिलकीची प्रचिती देताना विद्यापीठ कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त भागातील नागरिक आणि त्यांच्या जनावरांसाठी सुमारे ५७ क्विंटल धान्य आणि तीन ट्रक चाऱ्याचे वितरण काल केले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी काल दिवसभर आपल्या प्रशासकीय सहकाऱ्यांसह सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त आटपाडी आणि जत तालुक्यांची पाहणी करण्याबरोबरच चार गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन मदतीचे वाटप केले.कोणत्याही संकटाच्या वा आणीबाणीच्या प्रसंगी शिवाजी विद्यापीठाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपला खारीचा वाटा उचलण्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. यंदाही दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यापीठाने विद्यार्थी कल्याण विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या माध्यमातून संलग्नित महाविद्यालयांना मदतीसाठी आवाहन केले होते. तसेच, विद्यापीठ परिसरातही गवत व चारा संकलन केले होते. या माध्यमातून गहू, तांदूळ इत्यादी सुमारे ५७ क्विंटल धान्य गोळा झाले. तसेच, सुमारे तीन ट्रक चाराही जमा झाला. या सर्व मदतीचे काल, शुक्रवारी (दि. २९ एप्रिल) कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते चार गावांमध्ये प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी.के. गायकवाड होते. जत येथे शिवाजी विद्यापीठाकडून आलेल्या चाऱ्यांच्या ट्रकचे स्वागत विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते तडवळे (ता. आटपाडी) येथील ४५० कुटुंबांना सुमारे २२ क्विंटल तांदळाचे वाटप करण्यात आले. माडगुळे (ता. आटपाडी) येथील १०० कुटुंबे आणि त्यांची जनावरे यांच्यासाठी १० क्विंटल धान्य व १० क्विंटल सरकी पेंड देण्यात आली. वज्रवाड (ता. जत) येथील १०० कुटुंबे व त्यांच्या जनावरांसाठी १० क्विंटल धान्य व २ ट्रक चारा-गवत देण्यात आले. खिलारवाडी (ता. जत) येथील ५० कुटुंबे व त्यांच्या जनावरांसाठी ५ क्विंटल धान्यासह १ ट्रक चारा देण्यात आला.या प्रसंगी प्राचार्य डॉ. एस.आर. कारंडे, प्राचार्य डॉ. बी.एन. पवार, राष्ट्रीय सेवा योजना सांगली जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. सदाशिव मोरे, राजे रामराव महाविद्यालय, जत येथील कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र लवटे, डॉ. संगीता पाटील तसेच संबंधित तडवळे, माडगुळे, वज्रवाड, खिलारवाडी येथील सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
Leave a Reply