
कोल्हापूर : निर्भय व्हा, प्रश्न मांडा आणि न्याय मिळवा हा संदेश महिलांना देत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने ‘ महिला आयोग तुमच्या दारी ‘ यानुसार विभागीय महिला जनसुनावणीस कोल्हापूरात आज प्रारंभ केला. या जनसुनावणीचे कामकाज अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्वत:लक्ष देऊन यशस्वी केले.
येथील बाल कल्याण संकुलामध्ये विभागीय महिला जनसुनावणीचे कामकाज दोन पॅनेलमध्ये करण्यात आले. या विभागीय महिला जनसुनावणीचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, आयोगाच्या सदस्या वृंदा किर्तीकर, उमाताई खापरे, सांगली महापालिकेच्या माजी नगरसेविका भारती दिगडे, आयोगाचे उपसचिव लालसिंग गुजर, जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील, यांच्यासह जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, महिला संस्थांचे प्रतिनिधी व सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
विभागीय महिला जनसुनावणीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्यातील महिला आपापल्या तक्रारी घेऊन आल्या होत्या. या सहा जिल्ह्यातून आलेल्या महिलांचे प्रश्न आणि तक्रारींच्या जनसुनावणीसाठी तयार करण्यात आलेल्या पॅनेल क्रमांक 1 चे कामकाज महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षेखाली सुरु झाले. या पॅनेलमध्ये ऍ़ड. किरण खटावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, महिला संस्थांच्या प्रतिनिधी अंजना जाधव, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अशोक पाटील आदींनी पाहिले. तर पॅनेल क्रमांक 2 चे कामकाज महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या वृंदा किर्तीकर,सदस्य लालसिंग गुजर, ऍ़ड. आर.एस.पाटील, सहाय्यक पोलीस निरिक्षक आरती नांद्रेकर, महिला संस्थेच्या प्रतिनिधी राजश्री साकळे, जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी एस. डी. मोहिते यांनी काम पाहिले.
Leave a Reply