
कोल्हापू : शिवाजी विद्यापीठातर्फे आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या राष्ट्रीय एकता रॅलीला शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनींसह सर्वच घटकांचा उत्साही प्रतिसाद लाभला.
सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी विद्यापीठातर्फे राष्ट्रीय एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ वाजता प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे यांच्या हस्ते फ्लॅग-ऑफ करून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. विद्यापीठाच्या गेट क्र. ८ येथील क्रांतीवनापासून सुरू झालेली ही रॅली सम्राटनगर, दौलतनगर, गोखले विद्यामंदिर, सायबर चौक मार्गे विद्यापीठाचे गेट क्र. ६ ते मुख्य प्रशासकीय इमारत अशी आली. फेरी मार्गावर नागरिकांना स्वच्छता, एकतेचा संदेश देण्यात आला. मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात प्रभारी कुलगुरू डॉ. मोरे यांनी सर्व सहभागींना सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय एकता व एकात्मतेच्या अनुषंगाने केलेल्या कार्याविषयी अवगत केले. तसेच परिसर स्वच्छतेबाबत जागरुक राहण्याचे आवाहन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी सर्वांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. त्यानंतर सरदार पटेल यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा विभागप्रमुख पी.टी. गायकवाड, माजी कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे, डॉ. वासंती रासम, डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. अर्जुन चव्हाण, डॉ. एस.एस. महाजन यांच्यासह इतर शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
Leave a Reply