कोल्हापूर,: एम.फील./पीएच.डी.साठी मार्गदर्शकांना मान्यता देण्यासाठीची विद्यापीठ अनुदान आयोगाची (युजीसी) नवी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. युजीसीने गतवर्षी केवळ पदव्युत्तर संस्थांमधील नियमित शिक्षकांनाच मार्गदर्शक म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतल्याने महाविद्यालय स्तरावरील मार्गदर्शकांची तसेच संशोधक विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली होती. ती या नव्या अधिसूचनेमुळे दूर झाली आहे. या संदर्भात शिवाजी विद्यापीठाने गेले वर्षभर सातत्याने या विषयी युजीसीकडे पाठपुरावा केला. यामुळे देशातील ६००हून अधिक विद्यापीठांसह हजारो महाविद्यालयांसमोर निर्माण झालेला संशोधन मार्गदर्शकाविषयीचा पेच दूर झाला आहे. या मध्ये शिवाजी विद्यापीठाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.युजीसीने ‘एम.फील./ पीएच.डी. पदवी प्रदान करणेबाबत किमान मानदंड व प्रक्रिया विनिमय-२०१६‘ ही सन २००९च्या अधिसूचनेला अधिक्रमित करणारी अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये एम.फील./ पीएच.डी. प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पात्रता, मानके आणि प्रक्रियेचे नियम निर्धारित करण्यात आले आहेत. त्यामध्ये एम.फील./पीएच.डी. मार्गदर्शकांच्या पात्रतेचे निकषही स्पष्ट करण्यात आले आहेत.मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणताही नियमित शिक्षक, ज्याचे संदर्भित पत्रिकेमध्ये किमान पाच शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत;आणि विद्यापीठ/स्वायत्त विद्यापीठ, संस्था/ महाविद्यालय येथील कोणीही नियमित सहयोगी/ सहाय्यक प्राध्यापक, जो पीएच.डी. धारक असेल, आणि संदर्भित पत्रिकांमध्ये ज्याचे किमान दोन शोधनिबंध प्रकाशित झाले असतील, त्यांना मार्गदर्शक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ज्या विषयांत अशा शोधपत्रिका नसतील वा ठराविक ठिकाणीच त्या असतील, अशा वेळी लेखी स्वरुपात सशर्त परवानगी देता येईल.
Leave a Reply